युक्रेन आणि रशियामधील संघर्ष अजूनही सुरूच आहे. या पडलेल्या ठिणगीमुळे साऱ्या जगाला चिंता लागली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धग्रस्त युक्रेनमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत बैठक बोलावली होती. ही बैठक रविवारी रात्री ८ वाजता सुरू झाली, या बैठकीचा मुख्य अजेंडा युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्याचा होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन तास या बैठकीत चर्चा केली. बैठकीत नरेंद्र मोदींनी भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर आणि त्यांना तिथून बाहेर काढण्यावर भर दिला. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांना बाहेर काढणं ही प्राथमिकता असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी युक्रेनच्या शेजारील देशांसोबत अधिक सहकार्य केले जाईल.
भारत सरकार ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत २ मार्चपर्यंत आणखी सात चार्टर फ्लाइटची व्यवस्था करत असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. सध्या युक्रेनमध्ये सुमारे १६ हजार भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी लागणारी मदत करण्यासाठी एक समर्पित ट्विटर हँडल तयार करण्यात आलं आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे.
#WATCH | PM Narendra Modi chairs a high-level meeting on the Ukraine issue. pic.twitter.com/eJELxgnqmO
— ANI (@ANI) February 27, 2022
युक्रेनमध्ये युद्धापूर्वी २० हजार भारतीय उपस्थित होते. त्यापैकी ४ हजार प्रवासी युद्ध सुरू होण्यापूर्वी भारतात परतले होते. युद्ध सुरू झाल्यानंतर भारताने नागरिकांच्या सुटकेसाठी ऑपरेशन गंगा सुरू केले आहे. याअंतर्गत आतापर्यंत चार उड्डाणे झाली आहेत. पहिल्या विमानात २७० भारतीय मुंबईत पोहोचले होते. यानंतर दुसऱ्या विमानामध्ये २५० भारतीय आणि तिसऱ्या विमानातून २४० प्रवासी भारतात पोहोचले. चौथ्या विमानाने १९८ भारतीयांना मायदेशी आणण्यात आले.
हे ही वाचा:
युक्रेनच्या सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण
भाजपा खासदार जेपी नड्डा यांचे ‘या’ कारणासाठी ट्विटर हॅक
पेशावरमध्ये भीषण स्फोट! दोन पाकिस्तानी सैनिक ठार
‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींनी टांझानियाच्या भाऊ- बहिणीचे केले कौतुक
रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनने आपल्या हवाई सीमा बंद केल्या. अशा परिस्थितीत भारतीय नागरिकांना युक्रेनमधून हंगेरी, पोलंड आणि रोमानियामध्ये रस्त्याने आणून तेथून विमानाने भारतात येत आहेत. नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीही रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी भारतीयांच्या सुटकेसाठी चर्चा केली होती. त्यावर पुतीन यांनी सकारात्मकता दाखवली होती. त्यानंतर भारतीय दूतावासाने भारतीयांना प्रवास करत असताना वाहनांवर तिरंगा लावण्याच्या सूचना केल्या होत्या.