राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पाच दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी भारतातून रवाना झाले. २०१४ मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच अधिकृत अमेरिकेचा राज्य दौरा आहे.
“अमेरिकेचा दौरा ही आमच्या भागीदारीची गहनता आणि विविधता समृद्ध करण्याची संधी असेल. भारत-अमेरिका संबंध बहुआयामी आहेत, आणि विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होत आहेत,” असे पंतप्रधानांनी या ऐतिहासिक राज्य दौऱ्यावर जाण्यापूर्वी सांगितले. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कार्यकाळात अनेकवेळा अमेरिकेला भेट दिली आहे, परंतु कोणत्याही भेटीला राज्य भेट म्हणून वर्गीकृत केले गेले नव्हते, जी राजनैतिक प्रोटोकॉलनुसार सर्वोच्च दर्जाची भेट आहे.
२०१४ मध्ये सत्तेवर आल्यापासून, पंतप्रधान मोदींनी अनेक प्रसंगी अमेरिकेला भेट दिली आहे, ज्यात तीन राष्ट्राध्यक्षांसोबत त्यांची भेट झाली: बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन. पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या त्यांच्या पहिल्या अधिकृत राज्य दौऱ्यावर निघाले असताना, त्यांच्या मागील अमेरिका दौऱ्यांवर एक नजर टाकूया.
हे ही वाचा:
टायटॅनिकचे भग्नावशेष पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन जाणारी पाणबुडी बेपत्ता
ओडिशा अपघात प्रकरणी चौकशी सुरू असलेला सिग्नल इंजिनिअर कुटुंबासह बेपत्ता
इंडिगो एअरबसकडून ५०० विमाने खरेदी करणार
अंधारेच! कायंदे कुणामुळेबाहेर पडल्या हे कळले…
२०१४: २०१४मध्ये पहिल्यांदा सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या निमंत्रणावरून कामकाज विषयक दौऱ्यावर गेले. पंतप्रधान मोदींनी अधिकृत चर्चेसाठी बराक ओबामा यांची भेट घेतली आणि न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये हजारो भारतीय अमेरिकन लोकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
२०१५: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास शिखर परिषदेत न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेला (UNGA) संबोधित केले.
२०१६ : पंतप्रधान मोदी पुन्हा २०१६ मध्ये अमेरिकेला दुसर्या अधिकृत कामकाजाच्या भेटीसाठी गेले. ही ओबामा आणि मोदी यांच्यातील तिसरी द्विपक्षीय बैठक होती. त्यांना तत्कालीन उपाध्यक्ष जो बायडेन यांनी आमंत्रित केले होते. पंतप्रधान मोदींनी त्या वर्षी प्रथमच यूएस काँग्रेसला संबोधित केले जेथे त्यांनी हवामान बदलापासून दहशतवाद, संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य ते व्यापार आणि आर्थिक संबंध या मुद्द्यांवर भाष्य केले.
२०१७: २०१७ मध्ये पंतप्रधान मोदी तीन दिवसांच्या यूएस दौऱ्यावर गेले होते जेथे त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये पहिल्यांदाच ‘वर्किंग डिनर’चे आयोजन केले होते. मोदींनी टायसन कॉर्नर, व्हर्जिनिया येथील रिट्झ कार्लटन येथे भारतीय नागरिकांना संबोधित केले.
२०१९: पंतप्रधान मोदींनी सप्टेंबर २०१९ रोजी ह्यूस्टनमध्ये भारतीय-अमेरिकन समुदायाला त्यांच्या यूएस दौऱ्यादरम्यान ‘हाऊडी मोदी!’ नावाच्या कार्यक्रमात संबोधित केले. हा कार्यक्रम २२ सप्टेंबर रोजी टेक्सासमधील ह्यूस्टन येथे आयोजित करण्यात आला होता आणि संपूर्ण यूएसमधून सुमारे ५० हजार भारतीय वंशाचे लोक त्यात सहभागी झाले होते. मोदींशिवाय ट्रम्प यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केले.