संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची उच्चस्तरीय बैठक पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेत झाली. ही बैठक सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी झाली होती. पंतप्रधान मोदींनी यावेळी सागरी सुरक्षेत आंतरराष्ट्रीय सहकार्याचा मुद्दा मांडला. UNSC च्या अशा प्रकारच्या जाहीर चर्चेवरील बैठकीची अध्यक्षता करणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. मोदींनी या बैठकीच्या माध्यमातून सागरी सुरक्षेसंदर्भातील पंचसूत्री मांडली.
या बैठकीत समुद्री चाचेगिरी आणि असुरक्षेचा सामना करण्यासाठी रणनीती तयार करण्यावर चर्चा झाली. दहशतवाद आणि चाचेगिरीसाठी समुद्री मार्गांचा उपयोग केला जात असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. समुद्र हा आपल्या सर्वांचा वारसा आहे. सागरी मार्ग आंतरराष्ट्रीय व्यापाराची जीवनरेखा आहेत. हे महासागर आपल्या ग्रहाच्या भविष्यासाठी खूप महत्वाचे आहेत. परंतु, आपला सामायिक सागरी वारसा जपत असताना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागत आहे, असं पंतप्रधान मोदी या बैठकीत म्हणाले.
आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज’ हा या बैठकीमध्ये मुख्य चर्चेचा विषय होता. सागरी गुन्हेगारी आणि असुरक्षिततेचा ठोस मुकाबला करण्याच्या मार्गांवर आणि सागरी क्षेत्रात समन्वय बळकट करणं हे मुद्दे या चर्चेच्या केंद्रस्थानी होते. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने यापूर्वी सागरी सुरक्षा आणि सागरी गुन्हेगारीच्या विविध पैलूंवर चर्चा केली आणि अनेक ठराव मंजूर केले आहेत. पण पहिल्यांदाच उच्चस्तरीय खुल्या चर्चेत सागरी सुरक्षेवर विशेष अजेंडा म्हणून चर्चा झाली. पंतप्रधान म्हणाले की-
- वैध सागरी व्यापारातील अडथळे दूर केले पाहिजेत.
- सागरी वादावर शांततेत आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार तोडगा काढला पाहिजे.
- नैसर्गिक आपत्ती आणि सागरी आव्हानांचा सामना आपण मिळून केला पाहिजे.
- सागरी पर्यावरण आणि साधन सामग्रीचे संरक्षण केले पाहिजे.
- आपल्याला एक जबाबदार सागरी कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन दिले पाहिजे.