भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर दोन्ही देशांतील परस्परसंबंधांच्या माध्यमातून खूप काही सोबत घेऊन येणार आहेत. त्यात भारतातून तस्करी करून परदेशात नेण्यात आलेल्या आलेल्या प्राचीन मूर्ती, शिल्पकृती यांचाही समावेश आहे. अशा तस्करीला आळा घालण्यासंदर्भात पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात परस्परसंमती झाल्यानंतर अशा १५७ प्राचीन शिल्पकृती भारताला परत करण्यात आल्या आहेत. अमेरिकेकडून या कलाकृती परत करण्यात आल्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी बायडन यांचे आभार मानले आहेत.
या शिल्पकृतींमध्ये १०व्या, १२व्या शतकातील काही कलाकृती आहेत. बहुतांश मूर्ती या ११ ते १४व्या शतकातील आहेत. तांब्याच्या काही कलाकृती या ख्रिस्तपूर्व २००० या काळातीलही आहेत. जवळपास ४५ वस्तू या ख्रिस्तपूर्व काळातील आहेत. त्यातील जवळपास ७१ कलाकृती या विविध कलांशी संबंधित असून हिंदु संस्कृतीशी निगडित ६० कलाकृती त्यात आहेत. तर बौद्ध आणि जैन संस्कृतीशी संबंधित अनुक्रमे १६ आणि ९ कलाकृतींचाही त्यात समावेश आहे.
दगड, धातू अशा पदार्थांपासून या कलाकृती तयार करण्यात आलेल्या आहेत. ब्राँझमधील कलाकृतीत लक्ष्मीनारायण, बुद्ध, विष्णू, शिवपार्वती, २४ जैन तीर्थंकर यांच्या शिल्पांचाही समावेश त्यात आहे. नाव नसलेल्या देवतांची शिल्पेही त्यात आहेत. ब्रह्मदेवता, सूर्यरथ, नृत्य करणारी गणेशमूर्ती, विष्णू यांच्याही मूर्ती या शिल्पकृतींमध्ये आहेत. पर्शियन भाषेत नमूद केलेले गुरु हरगोविंद यांचे नाव लिहिलेली तलवारही त्यात समाविष्ट आहे.
हे ही वाचा:
अबब! अडीच लाख वर्षांपूर्वीही पुण्यात माणसाचे होते अस्तित्व
दिल्ली गँगवॉरमागे गोगी – टिल्लू गॅंगचे हाडवैर
राज्य सरकारची मागणी फेटाळली; जिल्हा परिषद निवडणुका ठरल्याप्रमाणेच…
जगभरातील अशा प्राचीन आणि भारतीय संस्कृतीशी निगडित वस्तू पुन्हा मिळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार तत्पर आहे. २०१४ ते २०२१ या काळात मोदी सरकारने २०० अशा शिल्पकृती परत आणण्यात आल्या आहेत किंवा ती प्रक्रिया सुरू आहे. तस्करी केलेल्या अशा शिल्पकृती अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, जर्मनी, कॅनडा, इंग्लंडमधून पुन्हा आणण्यात आल्या आहेत किंवा आणल्या जाणार आहेत.