पंतप्रधान मोदी दोन दिवसीय कुवेत दौऱ्यावर रवाना; आखाती देशाचा दौरा भारतासाठी महत्त्वाचा का?

४३ वर्षांतील भारतीय पंतप्रधानांचा पहिला दौरा

पंतप्रधान मोदी दोन दिवसीय कुवेत दौऱ्यावर रवाना; आखाती देशाचा दौरा भारतासाठी महत्त्वाचा का?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय दौऱ्यासाठी कुवेतला रवाना झाले आहेत. शनिवार, २१ डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी हे दिल्ली येथून कुवेतसाठी रवाना झाल्याची माहिती नरेंद्र मोदींनी ‘एक्स’वर दिली आहे. कुवेतमध्ये नरेंद्र मोदी देशातील सर्वोच्च नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत. तसेच कुवेतमधील भारतीय समुदायाशी संवादही साधणार आहेत. तेथील भारतीय कामगार शिबिरालाही नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रमुख आखाती देशांपैकी एक असलेल्या या देशाचा दौरा हा ४३ वर्षांतील भारतीय पंतप्रधानांचा पहिला दौरा असणार आहे. या भेटीदरम्यान संरक्षण आणि व्यापारासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी कुवेतला भेट देत आहेत.

नरेंद्र मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कुवेतसह भारताचे जुने संबंध असून गेल्या अनेक पिढ्या ते अधिकाधिक दृढ होत गेले आहेत, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या ऐतिहासिक भेटीपूर्वी सांगितले आहे. पुढे असेही म्हटले आहे की, “भारत हा कुवेतच्या प्रमुख व्यापार भागीदारांपैकी एक आहे. कुवेतमधील भारतीय समुदाय हा सर्वात मोठा प्रवासी समुदाय आहे. या भेटीमुळे भारत आणि कुवेतमधील बहुआयामी संबंध अधिक दृढ करण्याची संधी मिळेल.”

शनिवारी संध्याकाळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय समुदायाशी संवाद साधतील आणि अरबी गल्फ कप या फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहतील. आपल्या प्रस्थानाच्या निवेदनात, नरेंद्र मोदी म्हणाले की, ते अमीरांसोबतच्या त्यांच्या भेटींसाठी उत्सुक आहेत आणि दोन्ही देशांच्या लोकांच्या फायद्यासाठी भविष्यातील भागीदारीसाठी रोडमॅप तयार करण्याची ही संधी असेल.

गेल्या ४३ वर्षांतील या प्रमुख पश्चिम आशियाई देशाला भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. यापूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९८१ मध्ये कुवेतला भेट दिली होती. पंतप्रधान मोदी कुवेती नेतृत्वासोबत व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संस्कृती आणि लोक संपर्क या क्षेत्रांसह द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण क्षेत्रांचा आढावा घेतील. कुवेती क्राउन प्रिन्स पंतप्रधान मोदींसाठी मेजवानीचे आयोजन करतील. तसेच नरेंद्र मोदींना बायन पॅलेसमध्ये लष्कराकडून मानवंदना देण्यात येईल, त्यानंतर ते कुवेतचे अमीर आणि युवराज यांच्याशी स्वतंत्र बैठक घेतील. यानंतर, कुवेतच्या पंतप्रधानांशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा होईल, ज्या दरम्यान दोन्ही बाजू द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतील.

हे ही वाचा  : 

कल्याण प्रकरण; धीरज देशमुख यांच्यावर हल्ला करणारे सुमित जाधव, दर्शन बोराडे अटकेत

बांगलादेशात तीन हिंदू मंदिरांतील मूर्तींची विटंबना; अलाल उद्दीनला ठोकल्या बेड्या

मॅग्डेबर्गमधील ख्रिसमस मार्केटमध्ये गाडी घुसून दोन ठार; सौदीच्या ५० वर्षीय डॉक्टरला अटक

हिवाळी अधिवेशनात व्यत्ययामुळे लोकसभेचे ७० तास वाया!

पंतप्रधान मोदींचा कुवेत दौरा महत्त्वाचा का मानला जात आहे?

कुवेतकडे सध्या गल्फ कोऑपरेशन कौन्सिलचे (GCC) अध्यक्षपद आहे. यामध्ये संयुक्त अरब अमिराती, बहरीन, सौदी अरेबिया, ओमान आणि कतार यांचा समावेश आहे. हा एकमेव GCC सदस्य देश आहे ज्याला पंतप्रधान मोदींनी २०१४ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर भेट दिलेली नाही. २०२२ मध्ये दौरा निश्चित झाला होता मात्र कोविड महामारीमुळे पुढे ढकलण्यात आला. आखाती देश भारतासाठी प्रमुख व्यापार आणि गुंतवणूक भागीदार आहेत. त्यामुळे हा दौरा महत्त्वाचा आहे.

Exit mobile version