मोदींच्या दौऱ्यानंतर आता चेन्नई ते ब्रुनेई…

हवाई सेवा, संरक्षण आणि अंतराळ सहकार्यासह विविध करारांवर स्वाक्षऱ्या

मोदींच्या दौऱ्यानंतर आता चेन्नई ते ब्रुनेई…

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय ब्रुनेई आणि सिंगापूर दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या दुसऱ्या दिवशी ब्रुनेईचे सुलतान हसनल बोलकिया यांच्याशी भेट घेतली. ब्रुनेईची राजधानी बंदर सेरी बेगवान येथील निवासस्थान इस्ताना नुरुल इमान येथे दोन्ही प्रमुख नेत्यांची द्विपक्षीय संबंधांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत दोन्ही देशांनी अनेक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.

ब्रुनेईची राजधानी बंदर सेरी बेगवान आणि भारतातील चेन्नई दरम्यान थेट हवाई सेवा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र यांच्या ब्रुनेई दौऱ्यादरम्यान ही घोषणा करण्यात आली. दोन्ही नेत्यांकडून याचे स्वागत करण्यात आले आहे. ही विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस असणार असल्याचे सांगण्यात आले आहे. थेट हवाई सेवेव्यतिरिक्त, दोन्ही देशांनी संरक्षण, अंतराळ यासह अनेक क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यासही सहमती दर्शवली आहे.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारांमुळे भविष्यात द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील अशी अपेक्षा आहे. परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, भारत आणि ब्रुनेई यांनी उपग्रह आणि प्रक्षेपण वाहनांसाठी टेलिमेट्री, ट्रॅकिंग आणि दूरसंचार केंद्रांच्या ऑपरेशनमध्ये सहकार्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारावर भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर आणि ब्रुनेईचे परिवहन आणि माहिती संप्रेषण मंत्री महामहिम पेंगिरन दातो शामहारी पेंगिरन दातो मुस्तफा यांनी स्वाक्षरी केली. यावेळी पीएम मोदी आणि ब्रुनेईचे सुलतानही उपस्थित होते. चर्चेनंतर संयुक्त निवेदन जारी करण्यात आले.

दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी यांच्यातील संबंध ओळखून दोन्ही नेत्यांनी या संदर्भात सहकार्य वाढविण्यास सहमती दर्शवली. दोन्ही बाजूंनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि इतर बहुपक्षीय मंचांवर एकत्र काम करण्याचे मान्य केले.

पंतप्रधान मोदींनी ब्रुनेईच्या सुलतान यांच्या भेटीने आनंद झाल्याचे म्हटले होते. पंतप्रधान मोडी ट्वीटकरत म्हणाले की, महामहिम सुलतान हाजी हसनल बोलकिया यांना भेटून आनंद झाला. आमची चर्चा विस्तृत होती आणि त्यात आमच्या राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचे मार्ग समाविष्ट होते. आम्ही व्यापार संबंध, व्यावसायिक संबंध आणि देवाणघेवाण आणखी वाढवणार आहोत.

हे ही वाचा :

…तर छत्रपतींचा पुतळा पडला नसता !

आरजी कर रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष मोठ्या रॅकेटचा भाग

कंदाहार अपहरणावरील वेबसीरिजमध्ये दिसणार इस्लामी अतिरेक्यांची खरी नावे

हिमाचलच्या सरकारी कर्मचाऱ्यांना या महिन्याचा पगारच नाही; पेन्शनरही वंचित

दरम्यान, दोन्ही प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर, शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाली, त्यानंतर दोन्ही देशांकडून अनेक करारांवर स्वाक्षरी झाल्या. सुलतान हाजी हसनल बोलकिया यांनी आयोजित केलेल्या दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेवून  पंतप्रधान मोदी सिंगापूरला रवाना झाले. दरम्यान, दोन राष्ट्रांनी गेल्या ४० वर्षांपासून राजनैतिक संबंध राखले असून ब्रुनेईला भारतीय राष्ट्रप्रमुखाची ही पहिलीच भेट आहे.

Exit mobile version