बिमस्टेक (बेल ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी-सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन) शिखर परिषदेपूर्वी थायलंडचे पंतप्रधान पैतोंगटार्न शिनावात्रा यांनी आयोजित केलेल्या अधिकृत डिनरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशचे अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस शेजारी बसलेले दिसले. पंतप्रधान मोदी आणि मोहम्मद युनूस एकत्र दिसल्याबद्दल विशेष चर्चा सुरू आहे. या काळात दोन्ही नेत्यांमध्ये औपचारिक चर्चा झाली की नाही याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख चाओ फ्राया नदीच्या काठावर असलेल्या शांग्री-ला हॉटेलमध्ये मोदींच्या शेजारी बसलेले दिसले. पंतप्रधान मोदी आणि बांगलादेशचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस उद्या म्हणजे शुक्रवारी (४ एप्रिल) बँकॉकमध्ये होणाऱ्या बिमस्टेक शिखर परिषदेदरम्यान भेटू शकतात. अशा परिस्थितीत, दोन्ही नेते एकत्र बसलेले दिसत असल्याने, शुक्रवारी होणाऱ्या बैठकीबद्दल लोक विविध अंदाज लावत आहेत. कारण गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये अनेक मुद्द्यांवरून तणाव निर्माण झाला आहे.
हे ही वाचा :
भाजपा सरकार हटेल तेव्हा वक्फ विधेयक रद्द करू!
“वक्फ (सुधारणा) विधेयकाचा गाभा म्हणजे देशाच्या संविधानापेक्षा कोणीही वर नाही”
दिल्लीत वक्फ विधेयक मंजूर, गुजरातेत समान नागरी कायद्याची तयारी
एकनाथ शिंदे म्हणजे ‘एसंशि’ तर UT म्हणजे ‘युज ॲंड थ्रो’
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पंतप्रधान शेख हसीना देश सोडून भारतात आल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि युनूस यांच्यातील ही पहिलीच भेट असणार आहे. हसीना शेख यांच्या सत्तेवरून हकालपट्टीनंतर आणि देशातील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांनंतर भारत आणि बांगलादेशमधील संबंध बिघडले आहेत, त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि युनूस यांच्यातील भेटीला महत्त्व आहे. त्यामुळे सर्वांचे या भेटीकडे लक्ष लागून आहे.