भारत ऑस्ट्रेलिया मैदानात आमनेसामने, मैदानाबाहेर दोस्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बनीज आले एकत्र

भारत ऑस्ट्रेलिया मैदानात आमनेसामने, मैदानाबाहेर दोस्ती

एकीकडे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये चौथा कसोटी सामना खेळविण्यात येत आहे आणि दुसरीकडे राजकीय मैदानात मात्र भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी एकमेकांशी असलेल्या मैत्रीचे संबंध अधिक सुदृढ केले आहेत.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज हे चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. ११ मार्चपर्यंत ते भारतात असतील. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये या चौथ्या कसोटीला सुरुवात झाली आहे. तिथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अल्बनीस उपस्थित होते. त्यानिमित्ताने दोन देशांतील आर्थिक, सामाजिक संबंध दृढ करण्याचा निश्चय करण्यात आला आहे. हेच दोन्ही देश जपान, अमेरिका यांच्यासोबत क्वाडमध्येही सहभागी आहेत. त्यामुळे चीनला एकप्रकारे इशारा देण्याचे कामही त्या माध्यमातून होत आहे.

हे ही वाचा:

महिला दिनाच्या निमित्ताने अनोखा माहेरवाशिणी महिला दिवस

होळीचे फोटो शेअर केले आणि काहीवेळाने अभिनेते सतीश कौशिक यांचे प्राणोत्क्रमण

इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ

उद्धव ठाकरे पंतप्रधान काय होणार? शिवसेना आता संपली, काही राहिलेलं नाही

भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध एकीकडे मजबूत होत असताना ऑस्ट्रेलियाने चीनशी मात्र दुरावा ठेवला आहे. २०२१च्या तुलनेत ऑस्ट्रेलियाने चीनशी केलेल्या व्यवहारात ३.९ टक्क्यांनी घट झाली आहे. ऑस्ट्रेलियाकडून चीनला केल्या जाणाऱ्या निर्यातीतही १३.१ टक्के घट झाली आहे. २०१४ पासून भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील हे संबंध अधिक वृद्धिंगत होत गेले. त्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. तीन दशकांनंतरचा तो पहिलाच भारतीय पंतप्रधानांचा ऑस्ट्रेलिया दौरा होता. त्याआधी १९८६मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांनी ऑस्ट्रेलियाला भेट दिली होती.

आता भारतात होत असलेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेच्या निमित्ताने भारत ऑस्ट्रेलिया हे आमनेसामने असले तरी मैदानाबाहेर मात्र हे दोन्ही देश एकमेकांच्या हातात हात घालून वाटचाल करणार असल्याची ग्वाही देत आहेत. २०१२मध्ये ऑस्ट्रेलियाच्या तत्कालिन पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड भारत दौऱ्यावर आल्या होत्या. पण आता या संबंधांना अधिक मजबुती मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बनीज भारत दौऱ्यावर आले आहेत. आणि त्या दौऱ्यादरम्यान या चौथ्या कसोटीच्या पहिल्याच दिवसाचा खेळ दोन्ही पंतप्रधान पाहणार आहेत. दोन्ही संघांच्या कर्णधारांच्या हातात हात घालून, राष्ट्रगीत गायले जात असतानाही दोन्ही पंतप्रधान मैदानावर दिसले. त्यामुळे आगामी काळात भारत ऑस्ट्रेलिया मैदानात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असतील पण मैदानाबाहेर ते एकमेकांचे तेवढेच उत्तम मित्र राहणार आहेत.

Exit mobile version