कॅनडातील टोरंटो विमानतळावर विमान उलटले; १८ प्रवासी जखमी

बर्फाळ जमिनीवर उतरताना डेल्टा एअर लाइन्सच्या विमानाला अपघात

कॅनडातील टोरंटो विमानतळावर विमान उलटले; १८ प्रवासी जखमी

कॅनडातील टोरंटो विमानतळावर सोमवारी मोठा विमान अपघात झाला. डेल्टा एअरलाइन्सचे एक विमान लँडिंग करताना उलटल्याची घटना घडली असून या विमानात क्रू मेम्बर्ससह ८० प्रवासी होते. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नसली तरी १८ जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर आपत्कालीन पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी सर्व प्रवाशांना तात्काळ बाहेर काढले.

माहितीनुसार, विमानतळावर साचलेल्या बर्फामुळे हे विमान उतरताना उलटले. सोमवारी कॅनडातील टोरंटो पियर्सन विमानतळावर डेल्टा एअर लाइन्सचे विमान बर्फवृष्टीदरम्यान लँडिंग करताना उलटले. विमानात ७६ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स होते. ८० प्रवाशांपैकी १८ जण जखमी झाले आहेत. एका मुलासह तीन जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. दोघांना विमानाने ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले, तर मुलाला बाल रुग्णालयात नेण्यात आले आहे. उर्वरित १२ जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. डेल्टा एअरलाइन्सचे हे विमान मिनियापोलिसहून टोरंटोला येत होते. लँडिंग दरम्यान विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते उलटले. दरम्यान, या घटनेची अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली असून सध्या विमानतळावरील दोन धावपट्ट्या बंद राहतील, असे वृत्त दिले आहे.

हे ही वाचा : 

ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती

युवा लेखक म्हणून विवान कारुळकरला वर्ल्ड रेकॉर्ड्स विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट

केरळच्या पलक्कडमध्ये झळकले हमास, हिजबुल्ला दहशतवाद्यांचे पोस्टर्स

‘केजरीवाल, सिसोदिया आणि आतिशी यांनी उर्जा वाचवून ठेवावी, दररोज न्यायालयात जावे लागणार’

अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये विमान बर्फाळ जमिनीवर उतरताना दिसत आहे. काही वेळातच त्यातून काळा धूर निघू लागला आणि अचानक आग लागली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आणि धूर नियंत्रित करण्यासाठी विमानावर पाणी ओतण्यास सुरुवात केली. डेल्टा एअरलाइन्सने एक्सवर पोस्ट करून या अपघाताची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, डेल्टा एअरलाइन्सचे फ्लाइट ४८१९ सोमवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी २:१५ वाजता टोरंटो पियर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. हे विमान मिनियापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टोरंटोला येत होते. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे. तथापि, १८ प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version