दक्षिणपूर्व आफ्रिकेमधील मलावी देशाचे उपराष्ट्रपती सॉलोस क्लॉस चिलिमा यांच्यासह आणखी नऊ जणांना घेऊन जाणारे विमान सोमवारी बेपत्ता झाले आहे. मलावीच्या राष्ट्रपती कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.
‘विमान रडारवरून बेपत्ता झाल्यानंतर विमान अधिकाऱ्यांनी वारंवार विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही,’ असे राष्ट्रपती कार्यालय आणि कॅबिनेटने सोमवारी जाहीर केलेल्या एका निवेदनात सांगण्यात आले आहे. ५१ वर्षीय चिलिमा मलावी सुरक्षा दलाच्या विमानातून प्रवास करत होते. हे विमान स्थानिक वेळेनुसार, सकाळी नऊ वाजून १७ मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार, दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी) राजधानी लिलोंग्वे येथून रवाना झाले होते. हे विमान उत्तर भागातील म्जुजु येथे उतरणे अपेक्षित होते. मात्र, मध्येच विमानाचा संपर्क तुटला. विमान गायब झाल्यापासून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
शीख समुदायाबाबत कामरान अकमलने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा हरभजन सिंगने घेतला समाचार
आस्था जिहादविरुद्ध त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदू एकटवला
‘सुरक्षित आणि मजबूत भारतनिर्माणाचे कार्य सुरूच राहील’
रेल्वे पोलीस विभागाला ४०० टक्क्याचे अमिष दाखवून निविदा केली मंजूर
विमान गायब झाल्याचे कळताच मलावीच्या राष्ट्रपतींनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. विमानाचा माग काढण्यासाठी तत्काळ शोधमोहीम राबवण्याचे आदेश राष्ट्रपतींनी सर्व विभागीय आणि राष्ट्रीय तपास संस्थांना दिले आहेत. सन २०२२मध्ये चिलिमा यांना ब्रिटिश-मलावी व्यावसायिकाशी संबंधित लाच प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. तेव्हा यांच्याकडून त्यांचे अधिकार काढून घेण्यात आले होते. गेल्या महिन्यात मलावीतील न्यायालयासमोर हजर झाल्यानंतर एका न्यायालयाने त्यांच्यावरील आरोप रद्द केले होते.