फिलिपिन्स, नायजेरिया, अर्जेंटिनाला हवीत भारतीय बनावटीची ‘तेजस’ विमाने

व्यवहाराबाबत बोलणी सुरू

फिलिपिन्स, नायजेरिया, अर्जेंटिनाला हवीत भारतीय बनावटीची ‘तेजस’ विमाने

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत या उपक्रमाला चालना दिली असून सध्या संरक्षण क्षेत्रात स्वदेशी बनावटीची शस्त्रे वापरण्यावर जोर दिला जात आहे. अशातच चर्चा आहे ती स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ या हलक्या लढाऊ विमानांची. या विमानांच्या खरेदीसाठी नायजेरिया, फिलिपिन्स आणि अर्जेंटिना इच्छुक असल्याची माहिती हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे (एचएएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सी. बी. अनंतकृष्णन यांनी दिली आहे. शुक्रवार, ८ डिसेंबर रोजी त्यांनी ही माहिती दिली असून या देशांबरोबर यासंदर्भात बोलणी सुरू असल्याचे त्यांनी ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले.

अनंतकृष्णन म्हणाले की, “तेजस हे भारतीय बनावटीचे हलके लढाऊ विमान खरेदी करण्यासाठी नायजेरिया, फिलिपिन्स आणि इजिप्त हे देश उत्सुक आहेत. मात्र, या विमानातील काही घटक ब्रिटनने पुरविले असल्याने अर्जेंटिनाशी विमानांचा खरेदी कसा करायचा, यासंदर्भात मार्ग शोधला जाईल.”

१९८२ च्या फॉकलंड युद्धानंतर ब्रिटनने अर्जेंटिनावर लष्करी विक्रीसंदर्भात निर्बंध लादले आहेत. विशेषतः ब्रिटनकडून निर्मिती केलेल्या लष्करी उपकरणांची अर्जेटिनाला विक्री केली जात नाही. त्या पार्श्वभूमीवर अनंतकृष्णन यांनी हा खुलासा केला. ब्रिटनने अर्जेंटिनावर लादलेल्या या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनने पुरविलेल्या उपकरणांचा समावेश असलेल्या तेजस विमानाची विक्री करणे, भारतासाठी सोपे नसेल. नुकतीच जुलैमध्ये अर्जेंटिनाच्या संरक्षणमंत्र्यांनी संरक्षण औद्योगिक सहकार्य वाढविण्यासाठी भारताचा दौरा केला होता. ‘एचएएल’नेही अर्जेंटिनाच्या हवाई दलाशी दोन टनांच्या हेलिकॉप्टरची सेवा पुरविण्यासंदर्भात करार केला होता.

अर्जेंटिनाबरोबरच भारताचे फिलिपिन्स बरोबरचे संरक्षण सहकार्यही वृद्धिंगत होत आहे. यावर्षीच्या सुरुवातीला, जानेवारीत फिलिपिन्सने ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या तीन बॅटऱ्यांच्या खरेदीसाठी भारताशी सुमारे ३७५ दशलक्ष डॉलरचा करार केला होता.

‘तेजस’ची वैशिष्ट्ये

‘तेजस’ हे भारताचे स्वदेशी बनावटीचे एकच इंजिन असणारे बहुआयामी विमान असून ते हवेच्या धोकादायक वातावरणातही सक्षम राहू शकते. हवाई संरक्षण, समुद्रात हेरगिरी करण्याच्या आणि हल्ल्यात भूमिका बजावण्याच्या दृष्टीने या विमानाचा आराखडा बनविण्यात आला आहे.

हे ही वाचा:

“पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत यांना बळीचा बकरा केलं”

ज्युनिअर मेहमूद यांची कॅन्सरशी झुंज अपयशी

नवाब मलिक महायुतीत नको!

नो वन किल्ड दिशा…

भारतीय हवाई दलाला अधिक सक्षम करण्यासाठी म्हणून सुरुवातीच्या टप्प्यात हवाई दलात ४० विमानांचा समावेश करण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयाने २०२१ मध्ये हवाई दलासाठी ८३ तेजस विमानांच्या खरेदीसाठी ४८ हजार कोटींचा करार केला होता.

Exit mobile version