जॉन्टी ऱ्होड्सची मुलगी ‘इंडिया’ची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली दखल

जॉन्टी ऱ्होड्सची मुलगी ‘इंडिया’ची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली दखल

देशात आज सर्वत्र प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी देशाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ख्रिस गेल याने देखील आजच्या दिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्सने भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर एक पत्र शेअर केले आहे.

” जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीचे नाव आमच्या महान राष्ट्राच्या नावावर ठेवले, तेव्हाच तुमचे भारत आणि इथल्या संस्कृतीशी असलेले नाते स्पष्ट झाले.” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रातून ऱ्होड्सला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जॉन्टी ऱ्होड्सने शेअर केलेल्या पत्रासोबत ट्विटमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणाला, ” धन्यवाद नरेंद्र मोदीजी. मी तुमचा मनापासून आभारी आहे. मी जेव्हा जेव्हा भारतात आलो त्या त्या वेळी माझी वैयक्तिक स्तरावर नेहमीच प्रगती होत राहिली. लोकांच्या हक्कांच्या रक्षण करणाऱ्या राज्यघटनेचा महत्वाचा सन्मान म्हणजे प्रजासत्ताक दिन. या दिवशी माझं संपूर्ण कुटुंब भारतीय लोकांप्रमाणे प्रजासत्ताक दिन साजरा करते. असे ट्विट करत त्याने पंतप्रधान मोदींना नम्र शब्दात उत्तर दिले आहे.

जॉन्टी ऱ्होड्सची भारताबद्दल असलेल्या आपुलकीचे कौतुक करत त्याला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मजबूत राजदूत यासाठीचा ‘ विशेष राजदूत ‘ असे संबोधून सन्मान केला आहे.

हे ही वाचा:

राजपथावर संचलन पाहायला होते ‘हे’ खास पाहुणे

भारतीय महिला हॉकी संघाला उघडले वर्ल्डकपचे दरवाजे

राजपथावर पंतप्रधान मोदींच्या लूकची चर्चा

पद्म पुरस्कार देताना बुद्धदेव भट्टाचार्य यांना विचारले नसावे!

दुसरीकडे, ख्रिस गेलने प्रजासत्ताक दिनानिमित्तानं एक ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये त्याने, ” मी सगळ्या भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक संदेशाने माझी आजची सकाळ उत्साहवर्धक झाली. माझे भारतीयांशी आणि भारताशी असलेले चांगले संबंध लक्षात घेता त्यांनी मला विशेष  संदेश पाठवला. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. सर्वांना युनिव्हर्स बॉसकडून शुभेच्छा आणि खूप सारे प्रेम. ” या शब्दात गेलनं शुभेच्छा दिल्या आहेत.

गेल्या दोन दशकांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असलेला गेल भारतामध्ये भरपूर क्रिकेट खेळला आहे. तो आयपीएल टीमचाही सदस्य होता. त्याचे भारतामध्ये भरपूर फॅन्स आहेत.

Exit mobile version