बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानात जाफर एक्स्प्रेसचे अपहरण केल्याच्या घटनेने जगभरात खळबळ उडाली. बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा ते पेशावर असा प्रवास ही रेल्वे करत होती. त्याच दरम्यान बलोच स्वातंत्र्ययोद्ध्यांनी आक्रमण केले आणि या रेल्वेचे अपहरण केले. रेल्वेचे रुळ उद्ध्वस्त करून रेल्वेला बोगद्यात थांबवले. त्यानंतर शेकडो प्रवाशांना त्यांनी ओलीस धरले. हा हल्ला झाला तेव्हा जवळपास ४०० प्रवासी होते. या प्रवाशांना सोडविण्यासाठी पाकिस्तानने जर कारवाई केली तर या ओलीसांना ठार मारण्यात येईल, अशी धमकीही बलुच स्वातंत्र्ययोद्ध्यांनी दिली. या रेल्वेतील महिला, मुले आणि बलुचिस्तानचे प्रवासी यांना मुक्त करण्यात आले. बाकीच्यांना बंधक बनवून ठेवण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानच्या सेनादलातील ६ जणांना त्यांनी मारल्याची बातमी समोर आली पण तर ३० पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचे वृत्त होते. त्या रेल्वेच्या चालकाचाही त्यात मृत्यू झाल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने प्रत्युत्तर देण्याचे ठरविले आणि त्यात १०४ ओलिसांची सुटका झाल्याचे सांगण्यात आले. तसेच बलोच स्वातंत्र्ययोद्ध्यांतील १६ जणांना मारल्याचेही वृत्त होते.
बलोच योद्ध्यांनी आपल्या बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी पाकिस्तानवर वारंवार हल्ले केलेले आहेत. पाकिस्तानने अन्याय्य पद्धतीने बलुची नागरिकांना तुरुंगात टाकल्याच्या विरोधात हे योद्धे लढत आहेत. त्यातूनच बलोच योद्धे हे पाकिस्तानच्या सैन्यावर आणि विविध पायाभूत सुविधांवर तीव्र हल्ले करत आहेत.
स्वतंत्र बलुचिस्तानचा मुद्दा नेमका काय आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. पाकिस्तान, इराण आणि अफगाणिस्तानात असलेला हा बलोच नावाचा समुदाय आहे. १९७३ ते ७७ या काळात ही स्वतंत्र बलुचिस्तानची मोहीम सुरू झाली.
१९४८ मध्ये इंग्रजांनी सत्ता सोडल्यानंतर बलुचिस्तानच्या खान ऑफ कलतने पाकिस्तानमध्ये विलिन होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय लोकांच्या सहमतीने झाला नसल्याचे म्हटले जाते. ११ ऑगस्ट १९४७ला कलत आणि पाकिस्तान यांच्यात हा करार झाला. तेव्हा कलत हा स्वतंत्र प्रदेश असेल असे म्हटले गेले. पण १९४८ मध्ये पाकिस्तानने बलुचिस्तानच्या विलिनीकरणाचा दबाव आणला. बलुचिस्तानच्या दोन्ही सभागृहांनी या विलिनीकरणाला विरोध दर्शविला होता. त्यातून खान ऑफ कलत यांना त्यांच्या कुटुंबियांसह बंदिवासात टाकण्यात आले. नंतर पाकिस्तानने बलुचिस्तानवर आक्रमण केले आणि सत्ता बळकावली. कलत वगळता मकारान, लासबेला व खरान या प्रांतांनी पाकिस्तानात विलीन होण्याची तयारी दर्शविली. तेव्हापासून प्रत्येक वेळी स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी केली गेली. २०००नंतर पुन्हा एकदा स्वातंत्र्याची ठिणगी पेटली. पाकिस्तानच्या जोखडातून मुक्त होण्याची भाषा केली जाऊ लागली. त्यातून बलोच नेते नवाब अकबर खान बुग्ती यांची हत्या २००६मध्ये झाली. २००९पासून पाकिस्तानने बलुचिस्तानबाबत मारा आणि गाडा अशी भूमिका घेतली. त्यातून बलुचिस्तानचे अनेक नेते अटकेत गेले. त्यांचे हाल करण्यात आले किंवा त्यांना मारण्यात आले.
यासंदर्भात ऑप इंडियाने बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटचे नेते डॉ. अल्ला नझर बलोच यांची मुलाखत घेतली तेव्हा ते म्हणाले की, आमची वेगळी संस्कृती आहे, भाषा आहेत, वैचारिक भूमिका वेगळ्या आहेत. इतिहास वेगळे आहेत. पाकिस्तानने जबरदस्तीने बलुचिस्तानवर कब्जा केलेला आहे. त्यांना बलुचिस्तानच्या विकासात रस नाही तर तिथे असलेले समुद्रकिनारे आणि खनिजे यांच्यात त्यांना रस आहे.
बलुच नागरिकांचा हा आरोप आहे की, पाकिस्तान आणि चीन यांनी बलुचिस्तानच्या नैसर्गिक समृद्धीचा नाश केला आहे. विशेषतः ग्वादार बंदराच्या माध्यमातून त्यांनी हे केले आहे. स्थानिकांना त्याचा कोणताही फायदा नाही.
बलुचिस्तानात तेल, नैसर्गिक वायू, तांबे, सोने, कोळसा यांचे मोठे साठे आहेत. पण असे असूनही तेथील स्थानिकांना त्याचा कोणताही फायदा मिळत नाही, असे बलुचिस्तानच्या नेत्यांचे म्हणणे आहे. किंबहुना, पाकिस्तानकडून बलुचिस्तानचे आर्थिक शोषण केले जात असल्याचाही आरोप आहे. त्याशिवाय, तेथील बलुची भाषेचाही मुद्दा आहे. या भाषेचे संवर्धन करण्याऐवजी पाकिस्तानकडून त्या भाषेचा गळा घोटण्याचे काम सुरू असल्याचा आरोप होतो. पाकिस्तानने बलुची नागरिकांवरील अत्याचारांचा परिसीमा गाठली आहे. बलुची नागरिकांचे अपहरण, हत्या यात वाढ झालेली आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार २० हजार बलुची नागरीक बेपत्ता आहेत. त्यातूनच बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा मुद्दा जोर धरत आहे. रेल्वेचे करण्यात आलेले अपहरण हा त्याचाच एक भाग आहे.