अफगाणिस्तानात शांतीसेना जाणार?

अफगाणिस्तानात शांतीसेना जाणार?

अफगाणिस्तानमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तिथे मोठ्या संख्येने शांती सेना पाठवली जाण्याची शक्यता आहे. या संदर्भातला निर्णय भारताच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत होण्याची शक्यता आहे.

अमेरिका अफगाणिस्तानमधून वेगाने बाहेर पडण्याची तयारी करत आहे. अफगाणिस्तानचे सैनिक आणि तालिबान यांच्यात संघर्ष सुरू आहे. तालिबानला पाकिस्तानकडून मदत मिळत असल्याचे आरोप अफगाणिस्तान सरकारने केले आहेत. या अशा वातावरणात भारत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष झाला आहे. सुरक्षा परिषदेची १८ आणि १९ ऑगस्ट रोजी बैठक आहे. या बैठकीत अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर चर्चा होणार आहे. सुरक्षा परिषदेच्या बैठकीआधी अमेरिकेत महत्त्वाच्या चर्चा आणि बैठकांसाठी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर रवाना होत आहेत. यामुळेच अफगाणिस्तानमध्ये शांती सेना पाठवली जाणार असल्याची चर्चा जोर धरत आहे.

भारत सध्या सुरक्षा परिषदेचा तसेच सागरी सुरक्षा समिती, शांती रक्षण समिती, आणि दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय करणारी समिती यांचाही अध्यक्ष आहे. यामुळे दहशतवादाच्या मुद्यावर भारत पाकिस्तान आणि चीन यांना चहूबाजूने घेरण्याची तयारी करत आहे.

हे ही वाचा:

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे वाहनप्रवास होणार अधिक सुरक्षित

‘या’ दिवशी राम मंदिर भाविकांसाठी उघडणार

जेंव्हा मोदी विरोधकांची आपसातच जुंपते….

पूरग्रस्तांना ११,५०० नाही, तर केवळ १५०० कोटींची तातडीची मदत

सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे. यामुळे भारताकडून आम्हाला मोठी आशा आहे, असे ट्वीट अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद हनीफ अतमार यांनी केले. या ट्वीटमुळेच सुरक्षा परिषदेत भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत शांती सेना पाठवण्याबाबत निर्णय होईल, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. भारत सरकारने तालिबानच्या हिंसक कारवायांचा जाहीरपणे निषेध केला आहे. निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेत आलेल्या अफगाणिस्तान सरकार विरोधात तालिबान करत असलेल्या कारवायांचा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने निषेध केला आहे. शस्त्रांच्या बळावर तालिबान सत्तांतराचा प्रयत्न करत असल्यास त्याला भारताचा विरोध राहील, असे सूतोवाच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. यामुळे पुढील काही दिवसांत अफगाणिस्तान संदर्भात आंतरराष्ट्रीय पटलावर अनेक महत्त्वपूर्ण घडामोडींची शक्यता व्यक्त होत आहे.

Exit mobile version