पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि भारताचा मोस्ट वाँटेड अतिरेकी शाहिद लतिफ याची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमध्ये त्याची हत्या झाल्याचे वृत्त समोर आली आहे. पाकिस्तानातील सियालकोटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी शाहिद लतिफवर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएने शाहिदच्या विरोधात यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. शाहिद लतीफ हा पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. भारताच्या मोस्ट वाँटेड अतिरेक्यांच्या यादीत त्याचा समावेश होता. शाहिद लतिफ हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुजरांवाला येथील रहिवाशी होता. शिवाय जैश ए मोहम्मद या अतिरेक्यांच्या संघटनेत होता आणि या अतिरेकी संघटनेचा तो सियालकोटचा कमांडर होता.
भारतात अतिरेक्यांना पाठविण्याच्या योजनांवर देखरेख करणं आणि दहशतवादी हल्ल्याची योजना आखणे यात त्याचा महत्त्वाचा वाटा असायचा. शाहिदला १२ नोव्हेंबर १९९४ रोजी अटक करण्यात आली होती. भारतातील तुरुंगात १६ वर्षाची शिक्षा भोगल्यानंतर त्याला २०१० नंतर वाघा बॉर्डरवरून निर्वासित करण्यात आलं होतं.
पंजाबच्या पठाणकोटमध्ये २ जानेवारी २०१६ मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सात भारतीय जवान शहीद झाले होते. त्यामागचा मास्टरमाइंड शाहिदच होता. त्याशिवाय इंडियन एअरलाइन्सचं विमान हायजॅक करण्यातही त्याचा हात होता.
हे ही वाचा:
पाच हजार घरे जमीनदोस्त; पॅलिस्टिनींची उपासमार
दादा भुसेंचा सुषमा अंधारेंना इशारा!
लेक लाडकी; महाराष्ट्रातल्या ‘नवदुर्गां’ना नवरात्रौत्सवाची भेट
ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्याचा संकल्प करूया
या आधी जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील बशीर अहमद पीर ऊर्फ इम्तियाज आलम यांची पाकिस्तानात अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली होती. बशीरला गोळ्या घालण्यात आल्या होत्या. रावळपिंडीत हा गोळीबार झाला होता. त्याला केंद्र सरकारने दहशतवादी घोषित केलं होतं. रावळपिंडीत बसून तो काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांना रसद पुरवण्याचं काम करत होता.