टायटॅनिक या बुडालेल्या जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी पाण्याखाली जवळपास १३ हजार फूट खोल गेलेल्या अत्यंत खर्चिक अशा टायटन या पाणबुडीचा शोध अद्याप लागलेला नाही. गेले काही तास खूप महत्त्वाचे होते. कारण या कालावधीत ती पाणबुडी सापडणे आवश्यक होते. अन्यथा पाणबुडीतील ऑक्सिजन संपुष्टात आला तर त्यातील पर्यटकांचा मृत्यू अटळ होता. मात्र ती अद्याप सापडलेली नाही.
तरीही पाण्यात लँडिंग फ्रेम (म्हणजे ज्यावर ही पाणबुडी पृष्ठभागावर उभी राहते) आणि त्या पाणबुडीचा मागील भाग (रिअर कव्हर) हे भाग सापडले आहेत. हे भाग टायटनचे असावेत असा कयास लावण्यात येत आहे. त्यामुळे या पाणबुडीचे नेमके काय झाले आहे, याविषयी प्रचंड कुतुहल आणि तेवढाच संशय बळावला आहे.
या पाणबुडीत बसलेल्या पाच पर्यटकांपैकी एकाचा मित्र जो स्वतः पेशाने पाणबुडा आहे, त्या डेव्हिड मिअर्सनने सांगितले की, या पाणबुडीचे दोन भाग पाण्याखाली सापडले आहेत. स्वयंचलित अशी पाण्याखाली जाणाऱ्या गाडीने हे दोन भाग टिपले आहेत. टायटॅनिकच्या जवळ हे स्वयंचलित वाहन पोहोचल्यावर त्याला हे दोन भाग दिसले. अर्थात, हे दोन्ही भाग त्याच टायटनचे आहेत अथवा नाहीत हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. या सगळ्या बचावकार्यात कॅनडा नौदलाची बोटही सहभागी झाली आहे. त्यांच्यासोबत वैद्यकीय पथकही आहे.
हे ही वाचा:
लाचखोर आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड निलंबित
पाटण्यात पुन्हा मोदीविरोधाचे महागठबंधन
‘मातोश्री’जवळील ठाकरे गटाच्या शाखेवर पालिकेचा बुलडोझर
खलिस्तानींसाठी आता डरना जरूरी है…
दरम्यान या पाणबुडीत बसलेले ब्रिटनचे अब्जाधीश हामिश हार्डिंग यांच्या कुटुंबियांनी याची जबाबदारी ओशन गेट या कंपनीवर टाकली आहे. ही पाणबुडी बेपत्ता झाल्यानंतर लागलीच कंपनीने त्याबाबत काही हालचाली केल्या नाहीत, असा कुटुंबियांचा आरोप आहे. हार्डिंग यांची चुलत बहीण कॅथलिन कॉसनेट यांनी सांगितले की, कंपनीने बराच वेळ वाया घालवला. टायटनशी संपर्क तुटल्यानंतर त्यांनी लागलीच त्याविषयी सांगायला हवे होते. जवळपास आठ तासांचा विलंब या पाणबुडीच्या बेपत्ता होण्याची बातमी जाहीर करण्यास झाला. आता जवळपास ही पाणबुडी हरवलेल्याला ९६ तास म्हणजेच चार दिवस उलटून गेले आहेत.