कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेले निर्बंध शिथिल होत असताना आता शाळाही सुरू कराव्यात, अशी मागणी करणारी ऑनलाईन याचिका दाखल करण्यात आली आहे. दीड वर्षाहून अधिक काळ लोटला, तरी मुंबईतील विद्यार्थ्यांनी शाळा पाहिलेली नाही. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, सामाजिक आणि शारीरिक नुकसान होत आहे. रुग्णांची संख्या ओसरत असताना शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी पालक आग्रही असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शाळा बंद असल्यामुळे मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. ९० टक्के विद्यार्थ्यांचे भाषा आणि गणित कौशल्य कमकुवत झाल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे, असे ऑनलाईन याचिका करणारे पालक सागर तेलारकर यांनी म्हटले आहे. मुंबईमध्येही बऱ्याचदा इंटरनेट सेवा सुरळीत नसते अशा वेळी शिकवणीमध्ये खंड पडतो. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवादही खुंटला आहे, असे ते म्हणतात.
ऑनलाईन शिक्षण पद्धतीची सवय कोणालाच नसल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांचाही गोंधळ उडतो. राज्यात आता निर्बंध शिथिल होत असताना मॉलसाठी परवानगी दिली आहे, मग शाळा सुरू करण्यास परवानगी का दिली नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ऑनलाईन शिक्षण असूनही शाळांकडून पूर्ण शुल्क वसूल केले जात आहे. केवळ ऑनलाईन शिक्षणापुरतेच शुल्क घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
हे ही वाचा:
पालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक; पण सर्वोत्तम फक्त तीन
म्हाडाचे रूप पालटण्यासाठी खर्च होणार बाराशे कोटी
एकट्या मोदींविरोधात विरोधकांची एकता
अमेरिकेच्या माघारीबद्दल त्या शहीद सैनिकाच्या वडिलांना दुःख
शाळा सुरू करण्यापूर्वी सरकारकडून सर्वेक्षण केले जात आहे. राष्ट्रीय पातळीवर पार पडलेल्या एका सर्वेक्षणात ५३ टक्के पालकांनी आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवण्याची तयारी दर्शवली आहे. सध्या कोरोनामुक्त भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत. याचबरोबर अन्य वर्गही सुरू करण्याची मागणी पालक आणि शिक्षक करत आहेत. शालेय शिक्षण विभागातर्फे सर्वेक्षण घेण्यात आले होते त्या आकडेवारीनुसार ८१.१८ टक्के पालकांनी शाळा सुरू व्हाव्यात, अशी इच्छा दाखवली आहे. यामध्ये शहरातील पालकांची संख्या जास्त आहे. सध्या शाळा सुरू नसल्याने बालमजुरी आणि कुपोषण यासारख्या समस्या पुन्हा डोकावत आहेत, त्यामुळे अनेक सामाजिक संस्थाही शाळा पुन्हा लवकरच सुरू कराव्यात अशी मागणी करत आहेत.