इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धबंदीचा करार झाला असला तरी हल्ले सुरूचं आहेत. अशातच आता दहशतवादी संघटना असलेल्या हमासला गाझा पट्टीमधून पॅलेस्टिनी नागरिकांचा विरोध होत असल्याचे समोर आले आहे. हमास विरोधी निदर्शनात भाग घेण्यासाठी शेकडो पॅलेस्टिनी नागरिक उत्तर गाझामध्ये रस्त्यावर उतरले असून त्यांनी चालू संघर्ष थांबवावा आणि हमासने सत्तेवरून पायउतार व्हावे अशी मागणी केली जात आहे. गाझा पट्टीच्या उत्तरेकडील भागातील बेत लाहिया येथे ही निदर्शने झाली, जिथे इस्रायली सैन्याने जवळजवळ दोन महिन्यांच्या युद्धविरामानंतर गाझावर पुन्हा जोरदार बॉम्बहल्ला सुरू केल्यानंतर आठवडाभरात गर्दी जमली होती.
मंगळवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये शेकडो निदर्शक, हमास विरोधात घोषणा देताना दिसत होते. तसेच त्यांच्या हातात “युद्ध थांबवा” आणि “आम्हाला शांततेत जगायचे आहे” असे घोषणा लिहिलेले बॅनर होते. माध्यमांच्या वृत्तानुसार, मुखवटा घातलेल्या आणि सशस्त्र हमासच्या दहशतवाद्यांनी निदर्शकांना जबरदस्तीने पांगवले आणि या प्रक्रियेत सहभागी झालेल्या अनेकांवर हल्ला केला.
मोहम्मद नावाच्या एका व्यक्तीने सांगितले की, “निदर्शने कोणी आयोजित केली हे माहित नाही. लोकांच्या वतीने संदेश देण्यासाठी भाग घेतला,” असे तो म्हणाला. मजदी, या एका निदर्शकाने सांगितले की, लोक आता युद्धाला थकले आहेत. जर हमासने गाझामधील सत्ता सोडणे हा उपाय असेल तर हमास लोकांच्या संरक्षणासाठी सत्ता का सोडत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गाझा शहराच्या पश्चिमेकडील जबालिया निर्वासित छावण्यांमधील काही निदर्शक टायर जाळत आणि युद्ध संपवण्याची मागणी करत असल्याचे दिसून आले. अज्ञात स्त्रोतांकडून आलेल्या टेलिग्राम संदेशांमध्ये बुधवारी गाझाच्या विविध भागात होणाऱ्या निदर्शनांना पुन्हा उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.
हमास २००७ पासून गाझावर राज्य करत आहे. जरी हमासचे अजूनही गाझा पट्टी प्रदेशात कट्टर निष्ठावंत समर्थक असले तरी इस्रायलशी युद्ध सुरू झाल्यापासून या गटावर टीका वाढली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील १७ महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या युद्धामुळे गाझा पट्टी उध्वस्त झाली आहे. २ मार्च रोजी इस्रायलने इस्रायली ओलिसांना सोडण्यास भाग पाडण्याच्या प्रयत्नात या प्रदेशात मदतीचा मार्ग रोखल्यानंतर मानवतावादी परिस्थिती पुन्हा बिघडली आहे.
हेही वाचा..
तुंगनाथ मंदिर मार्गावर जखमी युवकाचा यशस्वी बचाव केला
युवा लेखकांना मिळणार संधी; PM YUVA 3.0 कार्यक्रमाची घोषणा
मुंबईत मराठी न बोलल्याने दिला चोप
जितक्या मंदिरांचे पुरावे सापडतील तितक्या मंदिरांचे पुनरुज्जीवन करणार
हमासच्या ताब्यातील प्रदेशातील आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायलने गाझामध्ये पुन्हा लष्करी कारवाया सुरू केल्यापासून, किमान ७९२ पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. अधिकृत आकडेवारीवर आधारित एएफपीच्या आकडेवारीनुसार, ७ ऑक्टोबर २०२३ रोजी या गटाने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामुळे हे युद्ध सुरू झाले, ज्यामध्ये १,२१८ लोक मृत्युमुखी पडले, ज्यात बहुतेक नागरिक होते. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायलच्या प्रत्युत्तरात्मक लष्करी हल्ल्यात गाझामध्ये किमान ५०,०२१ लोक मारले गेले आहेत, ज्यात बहुतेक नागरिक आहेत.