पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत. इम्रान खान यांच्याविरुद्ध दहशतवादविरोधी कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे खान यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. तसेच लवकरच इम्रान खान यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एक न्यायाधीश आणि दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात त्यांचे सहकारी शाहबाज गिल यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यांच्यासोबत झालेल्या वागणुकीवरून इम्रान खान यांनी २० ऑगस्ट रोजी एका जाहीर सभेत बोलताना उच्च पोलीस अधिकारी, एक महिला दंडाधिकारी, पाकिस्तान निवडणूक आयोग आणि राजकीय विरोधकांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली होती.
इम्रान खान यांनी शाहबाज गिल यांच्या अटकेविरोधात इस्लामाबादमध्ये रॅली काढली होती. या रॅलीत हजारो नागरिक सहभागी झाले होते आणि या रॅलीचे सर्व टीव्ही वृत्तवाहिन्यांनी प्रक्षेपण देखील केले होते. यावेळी इम्रान यांनी धमकी देऊन देशाचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आणि पाकिस्तानची शांतता व्यवस्थेला बाधा आणण्याचा कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच इस्लामाबादच्या आयजीसह अनेक पोलीस अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.
हे ही वाचा:
एम्स आता ओळखले जाणार ‘या’ नावाने
इकबाल कासकरच्या बॉडीगार्डला मारणाऱ्या फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या
“उद्धव ठाकरेंनी शिवाजी महाराजांसारखा तह करायला हवा होता”
सिसोदियांसह १३ जणांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी
इम्रान खान यांच्याविरुद्ध दहशतवादविरोधी कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कधीही अटक केली जाऊ शकते किंवा त्यांना नजरकैदेत ठेवले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.