अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. यावरून जगभरात खळबळ उडालेली असताना डोनाल्ड ट्रम्प आणि अन्य राजकीय नेत्यांच्या हत्याचे कट रचल्याचे उघड झाले आहे. हा कट रचल्याप्रकरणी इराणशी संबंध असलेल्या एका पाकिस्तानी व्यक्तीवर आरोप ठेवण्यात आले आहेत. यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे.
अमेरिकेच्या न्याय विभागाने मंगळवारी या हत्या प्रकरणाचा खुलासा केला आहे. इराणशी संबंध असलेल्या एका पाकिस्तानी व्यक्तीवर अमेरिकेत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष्य करून अयशस्वी झालेल्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आरोप लावण्यात आला आहे. आसिफ मर्चंट असे या ४६ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने या योजनेचा खुलासा करताना म्हटले आहे की, एका पाकिस्तानी नागरिकाला इराणने यासाठी काम दिले होते. आसिफ मर्चंट असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर राजनैतिक हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ट्रम्प आणि माजी अमेरिकी अधिकाऱ्यांना मारण्याचा इराणचा प्लॅन होता.
न्याय विभागाच्या आरोपानुसार, इराणमध्ये काही काळ घालवल्यानंतर मर्चंट पाकिस्तानमधून अमेरिकेत आला. जूनमध्ये, आसिफ एका माणसाला भेटण्याच्या उद्देशाने न्यूयॉर्कला गेला होता, ज्याला तो हत्येचे काम देणार होता. त्याने दोन मारेकऱ्यांना ५ हजार डॉलर्स ॲडव्हान्सही दिले होते. मर्चंट अमेरिका सोडण्याचा विचार करत असतानाच त्याला गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती. जाण्यापूर्वी, त्याने असल्या मारेकऱ्यांना सांगितले होते की, तो पाकिस्तानला परत आल्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये लक्ष्यांच्या नावांसह पुढील सूचना देईल.
ब्रुकलीनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. काम फत्ते करण्यासाठी मर्चंटला न्यूयॉर्क शहराचा दौरा करणे आणि एका शूटरसोबत काम करण्यास सांगण्यात आले होते. पाकिस्तान आणि मुस्लिम जगताला नुकसान पोहोचविणाऱ्या लोकांना संपविण्याचे काम देण्यात आले होते, असे मर्चंटने म्हटले आहे. मर्चंटला १२ जुलैला अटक करण्यात आली. तो सर्व प्लॅनिंग करून अमेरिका सोडण्याची तयारी करत होता. त्याने शूटर शोधले होते जे अमेरिकेचेच गुप्तहेर निघाले आणि इराणचा सगळा प्लॅन उघडा पडला. रेकी करण्यासाठी एक महिला आणि हत्येनंतर पोलिसांचे लक्ष विचलित करण्यासाठी २५ लोक त्याला हवे होते.
हे ही वाचा:
बांगलादेशातील अंतरिम सरकारचे नेतृत्व करणारे मोहम्मद युनूस कोण आहेत?
विनेशने घडवला इतिहास; पहिली सुवर्ण किंवा रौप्य जिंकणारी महिला कुस्तीगीर ठरणार
बांगलादेशनंतर ब्रिटनमध्ये हिंसाचार; प्रवाशांसाठी सूचना जारी
आरोपपत्रात डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचा उल्लेख नसला तरी, ते आरोपींच्या लाक्ष्यांपैकी एक होते असे बोलले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा इराणचा डाव अमेरिकन अधिकाऱ्यांना समजल्यानंतर अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांची सुरक्षा वाढवण्यात आली.