पाकिस्तानी पत्रकाराची केनियामध्ये गोळ्या झाडून हत्या

पाकिस्तानी पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानी पत्रकाराची केनियामध्ये गोळ्या झाडून हत्या

पाकिस्तानी पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी पत्रकार अर्शद शरीफ यांची केनियामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पोलीस चकमकीत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. शरीफ यांच्या पत्नीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ट्विट करून त्यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे.

“मी माझा मित्र, पती आणि आवडत्या पत्रकाराला गमावलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केनियामध्ये त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. कृपया आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा. ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली आमच्या कुटुंबाचे फोटो, खासगी माहिती आणि रुग्णालयतील अखेरचे फोटो दाखवू नका,” अशी विनंती करणारे ट्वीट अर्शद शरीफ यांची पत्नी झवेरिया सिद्दिकी यांनी केलं आहे.

 

नैरोबी येथील बाहेरच्या भागात शरीफ यांची हत्या करण्यात आली. दरम्यान, केनियामधील पाकिस्तान उच्चायुक्तालय अद्याप यासंबंधी अधिक माहिती घेत आहे. मार्च २०१९ मध्ये शरीफ यांना पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी ‘प्राइड ऑफ परफॉर्मन्स’ने सन्मानित केलं होतं.

अर्शद शरीफ यांना हत्येची भीती असल्याने पाकिस्तान सोडून दुबईत वास्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा संशय आल्याने त्यांनी दुबईही सोडली होती. अफगाणिस्तानच्या हल्लेखोरांनी त्यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अर्शद यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या हत्येमुळे धक्का बसला असून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीही शोक व्यक्त केला असून सत्य बोलण्याची किंमत अर्शद यांना मोजावी लागल्याचे ते म्हणाले.

Exit mobile version