पाकिस्तानी क्रिकेटपटू घेणार लष्करी प्रशिक्षण

पीसीबीचे नवे चेअरमन मोहसीन नक्वी यांचा निर्णय

पाकिस्तानी क्रिकेटपटू घेणार लष्करी प्रशिक्षण

पाकिस्तानच्या खेळाडूंना लष्करी प्रशिक्षण दिले जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) नवे चेअरमन मोहसीन नक्वी यांनी संघातील खेळाडूंना लष्करी प्रशिक्षणाची गरज असल्याचं म्हटलं आहे. खेळाडूंना लष्करी प्रशिक्षणाची गरज का आहे याचे कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे. यासाठीचे शिबीर २५ मार्च ते ८ एप्रिलदरम्यान आयोजित केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मोहसीन नक्वी हे पाकिस्तानी खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर आणि मोठे षटकार मारण्याच्या त्यांच्या असमर्थतेवर समाधानी नाहीत. त्यामुळे त्यांनी लष्करी प्रशिक्षण खेळाडूंना देण्याची कल्पना मांडली आहे. या शिबिराचे आयोजन काकुल येथे विश्वचषकाच्या पूर्वार्धात पाकिस्तानच्या व्यस्त क्रिकेट वेळापत्रकात करण्यात आले आहे.

नक्वी म्हणाले की, “जेव्हा मी लाहोरमधील सामने पाहत होतो, तेव्हा मला वाटत नाही की तुमच्यापैकी एकानेही षटकार मारला जो स्टँडमध्ये गेला. जेव्हाही असा षटकार मारला जायचा, तेव्हा मला वाटायचे की एखाद्या परदेशी खेळाडूने तो मारला असेल. प्रत्येक खेळाडूचा तंदुरुस्ती उत्तम होईल अशी योजना मंडळाला तयार करण्यास सांगितले आहे. त्यासाठी तुम्हाला योग्य ते प्रयत्न करावे लागतील,” असे बोलत त्यांनी खेळाडूंची कानउघडणी केली आहे.

नक्वी पुढे म्हणाले की, “न्यूझीलंड, आयर्लंड आणि इंग्लंड या देशांचे संघ पाकिस्तानात येणार आहेत. यानंतर टी- २० वर्ल्डकप खेळायचा आहे. त्यामुळे शिबीर कधी आयोजित करायचे हा प्रश्न होता. मात्र, संधी मिळाली. काकुल येथील लष्करी अकादमीत सराव सत्र आयोजित करण्यात आलं आहे. हे सराव सत्र २५ मार्चपासून ८ एप्रिलपर्यंत होईल. पाकिस्तान लष्कर खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहे,” असे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

“५० वर्षे पवारांचे ओझे महाराष्ट्र वाहतो आहे”

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी म्हणाले, ‘तेलंगणात गुजरात मॉडेल राबवणार’

परिवारवादी लोक काळा पैसा लपवण्यासाठी भारताबाहेर बँक खाती उघडतात!

केंद्रात काँग्रेसची सत्ता येऊ दे मग मोदींना मारू; पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी

दुसरीकडे, प्रशिक्षण शिबिराच्या तारखांवरून पाकिस्तानात नवा वादंग उठण्याची चिन्हे आहेत. याचे कारण म्हणजे पाकिस्तान सुपर लीग संपल्यानंतर लगेचच हे शिबीर सुरू होणार आहे. या काळात पाकिस्तानच्या खेळाडूंना थोड्या विश्रांतीची गरज आहे. पाकिस्तान संघ गेल्या काही महिन्यापासून सातत्याने क्रिकेट खेळत आहे.

Exit mobile version