पॅलिस्टिनी नागरिकांसाठी पाकिस्तान म्हणे नववर्षाचे स्वागत करणार नाही!

सर्व कार्यक्रमांवर घातली बंदी

पॅलिस्टिनी नागरिकांसाठी पाकिस्तान म्हणे नववर्षाचे स्वागत करणार नाही!

संपूर्ण जग नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी करत असताना पाकिस्तानमधील जनता मात्र या जल्लोषाला मुकणार आहे. इस्रायल-हमास युद्धात मारले गेलेले आणि अजूनही होरपळणारे पॅलिस्टिनी नागरिक यांच्या ऐक्यभाव व्यक्त करण्यासाठी पाकिस्तानमध्ये नववर्षाच्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वारुल हक काकर यांनी तसे जाहीर केले आहे.

‘गाझा आणि वेस्ट बँकमध्ये पीडित पॅलेस्टिनींचा नरसंहार, विशेषत: निष्पाप मुलांचे हत्याकांड पाहून संपूर्ण राष्ट्र आणि मुस्लिम बंधू खूप दुःखी आहेत. ७ ऑक्टोबर, २०२३पासून इस्रायल फौजांच्या नृशंस हल्ल्यात सुमारे २१ हजार निष्पाप पॅलिस्टिनी मारले गेले आहेत. त्यात सर्वाधिक नऊ हजार ही निष्पाप मुले आहेत,’ असे काकर यांनी म्हटले आहे. त्यामुळेच गाझामधील नागरिकांप्रति ऐक्यभाव व्यक्त करण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांनी नववर्षाचे स्वागत साधेपणाने करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.

हे ही वाचा:

बब्बर खालसा इंटरनॅशनलचा नेता भारताकडून दहशतवादी घोषित

रशियाने युक्रेनवर १२२ क्षेपणास्रं डागली; ३१ नागरिक ठार

अभिषेक सोहळ्यापूर्वी राम मंदिराच्या प्रतिकृतीची प्रचंड विक्री!

अयोध्येत महर्षि वाल्मिकी विमानतळ, प्रभू रामचंद्रांच्या आगमनाचे चित्र!

पॅलिस्टिनींच्या लढ्याला पाकिस्तान आधीपासूनच पाठिंबा देत आहे. याच वर्षी ७ ऑक्टोबरला झालेल्या हमासच्या दहशतवादी हल्ल्याचे आणि त्यांनी इस्रायली नागरिकांच्या केलेल्या अपहरणाचे समर्थनही पाकिस्तानने केले होते.
पाकिस्तान सरकारने पॅलेस्टिनी लोकांना मदत करण्यासाठी दोनदा वस्तू पाठवल्या आहेत. तर तिसरी मदत लवकरच पाठवली जात आहे. त्याचप्रमाणे पॅलेस्टिनींना वेळेवर मदत करणे, गाझामधील जखमींना बाहेर काढणे आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पाकिस्तान सरकार इजिप्त आणि जॉर्डन यांच्या संपर्कात असल्याकडेही काकर यांनी लक्ष वेधले.

Exit mobile version