चाललंय काय? भारत चंद्रावर पोहोचला, कराचीतली मुले मात्र गटारात!

पाकिस्तान संसद सदस्य सय्यद मुस्तफा कमाल यांनी पाकिस्तानी सरकारला सुनावले खडेबोल

चाललंय काय? भारत चंद्रावर पोहोचला, कराचीतली मुले मात्र गटारात!

भारताचा शेजारी पाकिस्तान हा सध्या गंभीर आर्थिक संकटाला तोंड देत असून पाकिस्तानमध्ये महागाईने उच्चांक गाठला आहे. लोकांना मुलभूत गरजा भागविण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांमध्येही असंतोष निर्माण झाला आहे. हा असंतोष आता जनतेमध्ये न राहता याचे पडसाद आता संसदेत पडताना दिसत आहेत. अशातच पाकिस्तानने सरकारी कंपन्या विकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तानमधील राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी खासदार सय्यद मुस्तफा कमाल यांनी टीका करत पाकिस्तान सरकारला आरसा दाखवला आहे.

पाकिस्तान संसद सदस्य सय्यद मुस्तफा कमाल यांनी पाकिस्तान सरकारला आरसा दाखवत असताना भारताच्या प्रगतीबद्दल वक्तव्य केले आहे. भारताच्या चांद्र मोहिमेचा उल्लेख करत त्यांनी भारताच्या उपलब्धीची आणि कराचीची खराब स्थिती यांची तुलना केली आहे. मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट पाकिस्तानचे नेते सय्यद यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “आज कराचीची परिस्थिती अशी आहे की, जग चंद्रावर जात असताना कराचीतील मुले गटारात पडून मृत्यू पावत आहेत. पुढच्या क्षणी त्याच स्क्रीनवर बातमी येते की, भारताचे यान चंद्रावर उतरले आहे. परत, दोन सेकंदांनी कराचीत एका उघड्या गटारात पडून मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी येते.”

पुढे ते असेही म्हणाले की, “कराची हे पाकिस्तानचे ‘महसूल इंजिन’ आहे. देशात दोन बंदरे आहेत जी कराचीमध्ये आहेत. हे शहर संपूर्ण पाकिस्तान, मध्य आशिया आणि अफगाणिस्तानचे प्रवेशद्वार आहे. आम्ही येथून सुमारे ६८ टक्के महसूल गोळा करतो आणि देशाला देतो. परंतु, गेल्या १५ वर्षांपासून, कराचीला थोडेसेही शुद्ध पाणी दिले गेले नाही. जे पाणी आले, ते पाणी टँकर माफियांनी चोरले, साठवले आणि ते कराचीच्या लोकांना विकले,” अशी टीका त्यांनी केली. कराचीमध्ये ७० लाख मुले आहेत आणि पाकिस्तानमध्ये २.६ कोटीहून अधिक मुले आहेत जी शाळेत जाऊ शकत नाहीत, अशी भयाण परिस्थिती त्यांनी कथन केली.

हे ही वाचा:

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याचे सुवर्णयश

दक्षिण-पश्चिम मान्सून ३१ मेच्या सुमारास केरळ पोहोचणार

“सरकार आल्यानंतर पहिल्या १०० दिवसांचं व्हिजन तयार”

उबाठाच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे कसे काय?

पाकिस्तानच्याच राजकीय नेत्यांनी स्वतःच्या देशातील सरकारला आरसा दाखवून खडेबोल सुनावण्याची ही पहिली वेळ नसून यापूर्वीही अनेकदा असे झाले आहे. पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते आणि कट्टर धार्मिक नेते मौलाना फजल ऊर रेहमान यांनी पाकिस्तानच्या संसदेत काही दिवसांपूर्वी भारतासाठी गौरवोद्गार काढले होते. भारत जागतिक महाशक्ती होण्याच्या जवळ पोहचला आहे तर पाकिस्तान दिवाळखोरीपासून वाचण्यासाठी भीक मागत असल्याचं म्हणत त्यांनी पाकिस्तानी नेत्यांना आरसा दाखवला होता.

Exit mobile version