मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा हा भारतात दाखल होताच तपास यंत्रणांच्या चौकशीला सामोरे जाईल. या दरम्यान, अनेक खुलासे होण्याची शक्यता असून याचा रोख पाकीस्तानच्या दिशेने असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तहव्वूर राणा याने भारतात येऊन आपले तोंड उघडण्यापूर्वीचं पाकिस्तानने मात्र बचावासाठी तयारी सुरू केली आहे.
तहव्वूर राणापासून पाकिस्तानने स्वतःला दूर ठेवले असून स्पष्ट केले आहे की तो कॅनेडियन नागरिक आहे. राणाला भारतात प्रत्यार्पण केले जात असून राष्ट्रीय तपास संस्था त्याला ताब्यात घेईल. तहव्वुर राणा, पाकिस्तानी कॅनेडियन नागरिक, याला अमेरिकेत बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या लष्कर-ए-तोयबा (एलईटी) च्या कार्यकर्त्यांसाठी आणि १७४ हून अधिक लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या गटाला मदत पुरवल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते.
पाकिस्तानी वृत्तांनुसार, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी राणा याच्या भारत प्रत्यार्पणाबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे की, “तहव्वुर राणा याने दोन दशकांहून अधिक काळ त्यांच्या पाकिस्तान कागदपत्रांचे नूतनीकरण केलेले नाही. त्यांचे कॅनेडियन नागरिकत्व अगदी स्पष्ट आहे.” भारतात कायद्याला सामोरे गेल्यानंतर तहव्वूर राणा याचे पाकिस्तानी लष्कर तसेच आयएसआयशी असलेले संबंध स्थापित होऊ शकतात असे तज्ज्ञांचे मत आहे. मुंबई २६/११ हल्ल्याच्या कटात पाकिस्तानची भूमिका उघडकीस येऊ शकते अशी भीती इस्लामाबादला आहे. त्यामुळे ते आधीच यातून हात काढून घेत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, तहव्वूर राणाला अमेरिकेतून एका विशेष विमानाने भारतात परत आणले जात आहे. त्याला तिहार तुरुंगातील उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. त्याला तुरुंगात ठेवण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे.
हे ही वाचा..
येमेनच्या राजधानीवर रात्रभर अमेरिकेचे हवाई हल्ले
चारधाम यात्रा ३० एप्रिलपासून सुरू होणार
विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी ९५४ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च
भारताची निर्यात विक्रमी ८२० अब्ज डॉलर पार
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाला एफबीआयने २००९ मध्ये शिकागो येथे अटक केली होती. तो पाकिस्तानी- अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीशी संबंधित आहे. राणा हा या हल्ल्यातील एक प्रमुख व्यक्ती आहे असून दहशतवाद्याला पाठिंबा देण्यासाठी त्याला आणि इतरांना पाकिस्तानमध्ये मदत केल्याचा आरोप आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रानुसार राणा दहशतवाद्यांना हल्ल्याचे ठिकाण आणि भारतात आल्यानंतर राहण्याची ठिकाणे सांगून मदत करत होता. राणानेच ब्लू प्रिंट तयार केली होती, ज्याच्या आधारे दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता.