मलेशियाने पाकिस्तानचे बोईंग ७७७ विमान जप्त केले आहे. पाकिस्तानने भाडेपट्टीची/लिजची रक्कम न भरल्यामुळे ही नामुष्की ओढावली आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे हे विमान क्वालालामपुर येथे जप्त करण्यात आले आहे. या घटनेमुळे पाकिस्तानी अर्थव्यवस्थेचा दुबळा चेहरा पुन्हा जगासमोर आला आहे.
पाकिस्तानने २०१५ साली व्हिएतनामच्या कंपनीकडून दोन विमाने लिजवर घेतली होती. पण गेले अनेक महिने पाकिस्तानने या लीजचे पैसे भरलेले नाहीत. बोईंग ७७७ हे त्यापैकीच एक विमान आहे. मलेशियान कोर्टाच्या आदेशावरून ही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानी एअरलाईन्सने या निर्णयाला ‘एकतर्फी निर्णय’ म्हटले आहे. “युनायटेड किंगडम येथे पाकिस्तानी एअरलाईन्सचा खटला न्यायप्रविष्ट असतानाही मलेशियन कोर्टाने जप्तीचे एकतर्फी आदेश दिले.” असे पाकिस्तानी एअरलाईन्सने म्हटले आहे. “सर्व प्रवास्यांची योग्य ती काळजी घेतली जात असून त्यांच्या प्रवासाची पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे.” असेही पाकिस्तानी एअरलाईन्सकडून सांगण्यात येत आहे.
या परिस्थितीत मलेशियातील पाकिस्तानी दुतावासाचे अधिकारी मलेशियन सरकारच्या संपर्कात असून योग्य तो तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पाकिस्तानी एअरलाईन्सला दुस्तवासाकडून सर्वोपरी मदत मिळेल असे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तान बनला थट्टेचा विषय…
या प्रकरणावरून नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीगने इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला आहे. पाकिस्तान मुस्लिम लीगच्या नेत्या मरियम औरंगजेब यांनी या घटनेने पाकिस्तान थट्टेचा विषय बनलाय असे म्हटले आहे. ‘पकिस्तानचा सन्मान कोण परत मिळवून देणार?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.