राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या

उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीत अखेर प्रभू श्री रामांचे मोठ्या धुमधडाक्यात आगमन झाले. २२ जानेवारी रोजी भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला. प्रभू श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होताच देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला. शिवाय जगभरातील रामभक्तांनी जल्लोष साजरा केला. सर्वत्र एक आनंदाचे वातावरण तयार झालेले पाहायला मिळाले. मात्र, या सगळ्या दरम्यान, पाकिस्तानला चांगल्याच मिरच्या झोंबल्याचे चित्र आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या काही वेळानंतर पाकिस्तानने या सोहळ्याचा निषेध व्यक्त केला आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून ‘एक्स’ या सोशल मीडियावर प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे. “भारतामधील अयोध्या शहरातील बाबरी मशीद पाडून त्याठिकाणी बांधण्यात आलेल्या राम मंदिराचा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आम्ही निषेध करतो,” असे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, “दुःखदायक गोष्ट म्हणजे, भारताच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेने या घृणास्पद कृत्यासाठी जबाबदार गुन्हेगारांना केवळ निर्दोष सोडले नाही तर पाडलेल्या मशिदीच्या जागेवर मंदिर बांधण्यासही परवानगी दिली. गेल्या ३१ वर्षांतील घडामोडी आणि आजच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे पाहिले तर भारतातील वाढत्या बहुसंख्यांकवादाचे हे सूचक उदाहरण दिसत आहे. यातून भारतातील मुस्लिमांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात उपेक्षित ठेवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे,” असे या प्रसिद्धी पत्रकात पाकिस्तानने म्हटले आहे.

“अयोध्येत मशिदीच्या जागेवर मंदिर बांधल्यामुळे भारताच्या लोकशाही चेहऱ्याला एक काळा डाग लागला आहे. विशेष म्हणजे, यानंतर आता वाराणसीतील ज्ञानवापी मशीद आणि मुथरेतील शाही ईदगाह मशिदीचाही आता नंबर लागणार असल्याचे सांगतिले जाते. त्यामुळे ही यादी वाढतच जात आहे. या मशिदींनाही विनाशाचा सामना करावा लागलणार आहे,” असं विधान पाकिस्तानने मनातील जळजळ व्यक्त करताना केले आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री योगी म्हणाले- ज्या ठिकाणी संकल्प केला होता, त्याच ठिकाणी राम मंदिर बांधले!

पंतप्रधान मोदींच्या रूपाने ‘श्रीमंत योगी’ प्राप्त झाले आहेत

मुस्लिमांनी ज्ञानवापी आणि शाही ईदगाह हिंदूंच्या ताब्यात द्यावी!

राममंदिर १००० वर्षे अविचल, अटल!

“भारतातील ‘हिंदुत्व’ विचारसरणीच्या वाढत्या लहरीमुळे धार्मिक सलोखा आणि प्रादेशिक शांततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या दोन प्रमुख भारतीय राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बाबरी मशिदीचा विध्वंस किंवा ‘राम मंदिर’ उद्घाटन हे पाकिस्तानच्या काही भागांवर पुन्हा हक्क मिळवण्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून उद्धृत केले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने भारतातील वाढत्या इस्लामोफोबिया, द्वेषयुक्त भाषण आणि द्वेषपूर्ण गुन्ह्यांची दखल घेतली पाहिजे. संयुक्त राष्ट्र आणि इतर संबंधित आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारतातील इस्लामिक वारसा स्थळांना अतिरेकी गटांपासून वाचवण्यासाठी आणि धार्मिक संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी त्यांची भूमिका बजावली पाहिजे,” असं पाकिस्तानने पत्रकात म्हटले आहे.

Exit mobile version