पाकिस्तानच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयात सरकारी वकिलाने पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओके संदर्भात निवेदन दिले आहे. एकप्रकारे पाकिस्तान सरकारने इस्लामाबाद उच्च न्यायालयासमोर कबूल केले आहे की, पाकव्याप्त काश्मीर हा विदेशी प्रदेश आहे आणि त्यावर पाकिस्तानचा अधिकार नाही. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमधून अपहरण करण्यात आलेले कवी आणि पत्रकार अहमद फरहाद शाह यांचे विदेशी नागरिक म्हणून वर्णन केले.
कवी फरहाद शाहचा खटला लढणाऱ्या वकील इमान मजारी हाजीर यांनी हा दावा केला आहे. काश्मीर ही परदेशी भूमी असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील करत असल्याचे त्यांनी न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना सांगितले. सरकार काश्मीरला बाह्य भाग म्हणत आहेत. काश्मीरचा जो भाग पाकिस्तानने ताब्यात घेतला आहे, त्याला ते आझाद काश्मीर म्हणतात. त्याचवेळी भारत त्याला पीओके म्हणजेच पाकव्याप्त काश्मीर म्हणतो. भारताचा असा विश्वास आहे की पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा जम्मू आणि काश्मीरचा एक भाग आहे जो पाकिस्तानने जबरदस्तीने ताब्यात घेतला आहे.
पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांनी १५ मे रोजी रावळपिंडी येथील घरातून अपहरण केलेल्या अहमद फरहाद शाह यांच्या प्रकरणाची इस्लामाबाद न्यायालयात सुनावणी सुरू होती. इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मोहसीन अख्तर कयानी यांनी कवीच्या पत्नीच्या याचिकेनंतर फरहाद शाह यांना न्यायालयात हजर करावे, अशी इच्छा होती. त्यावेळी पाकिस्तानचे अतिरिक्त ऍटर्नी जनरल यांनी न्यायमूर्ती कयानी यांच्यासमोर युक्तिवाद केला की, फरहाद शाह पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोलिस कोठडीत आहे आणि त्यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयात हजर करता येणार नाही. अतिरिक्त ऍटर्नी जनरल म्हणाले की काश्मीर हा एक परदेशी प्रदेश आहे ज्याची स्वतःची घटना आणि स्वतःची न्यायालये आहेत.
दरम्यान, न्यायमूर्ती कयानी यांनी प्रतिवाद केला की, जर पाकव्याप्त काश्मीर हा परदेशी प्रदेश आहे, तर वृत्तानुसार पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानी रेंजर्स त्या जमिनीत कसे घुसले. तसेच कयानी यांनी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांवर लोकांचे जबरदस्तीने अपहरण करणे सुरू ठेवल्याबद्दल टीका केली. अहमद फरहाद शाह यांना धिरकोट पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे न्यायालयीन युक्तिवादाच्या वेळी समोर आले. त्यांच्यावर पीओकेमध्ये दोन गुन्हे दाखल आहेत. फरहाद शाह यांच्या पत्नीने रावळपिंडी येथील त्यांच्या राहत्या घरातून पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांनी अपहरण केल्याच्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती.
हे ही वाचा:
‘मां तुझे सलाम’ गाणे म्हणता म्हणता माजी सैनिकाने गमावले प्राण
प. बंगालमधील जयनगर मतदारसंघातल्या केंद्रातील ईव्हीएम तलावात फेकले
चेन्नईहून मुंबईकडे येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी
अल्पवयीन मुलीवर मौलावीकडून बलात्कार
अहमद फरहाद हे पत्रकार आणि कवी आहेत. ३८ वर्षीय अहमद पीओकेच्या बाग शहरातील असून त्यांनी अलीकडेच पीओकेमधील सरकारविरोधी निदर्शने कव्हर केली होती. पाकिस्तानी लष्करावर केलेल्या टीकेसाठी ते ओळखले जातात. अहमद यांच्या पत्नी झैनबने सांगितले की, त्यांचे पती पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचा पक्ष पीटीआय यांचे समर्थक आहेत. त्यामुळे सरकारी यंत्रणा त्यांच्यावर बराच काळ दबाव टाकत आहेत.