पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा सध्या अस्थिर भाग असून या भागात सातत्याने पाकिस्तानी लष्कर आणि पोलिसांविरोधात निदर्शने सुरू असतात. असेच गेल्या काही दिवसांपासून पीओकेमध्ये स्थानिकांनी आंदोलन सुरू केले आहे. नागरिकांच्या मुलभूत गरजाही पूर्ण होत नसून वाढत्या महागाईवरुन जनतेला संताप आता विकोपाला गेला आहे. त्यामुळे लोक रस्त्यावर उतरून निदर्शेने करत आहेत. अन्यायकारक करांवर पाकिस्तान सरकारच्या विरोधात पीओकेमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. लोकांचा संताप इतका वाढला आहे की हे प्रकरण आता पोलिसांच्या हाताबाहेर जात असून या निदर्शनांना हिंसक वळण मिळू लागले आहे. नागरिकांचा हा उद्रेक पाहता पाकिस्तान सरकार मात्र गडबडले असून नागरिकांच्या रागापुढे त्यांनी गुडघे टेकले आहेत. सरकारने पीओकेसाठी काही निधी देण्याची घोषणा केली आहे.
पीओकेमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. शुक्रवारपासून या भागात निदर्शने होत आहेत. सोमवारी सलग चौथ्या दिवशीही पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाली. मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. यामध्ये दोन आंदोलक आणि एका एसआयचा समावेश आहे. रविवारी झालेल्या गोंधळात १०० हून अधिक जण जखमी झाले होते. अखेर जनतेच्या या हिंसक आंदोलनापुढे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले आहेत. शहबाज शरीफ सरकारने तात्काळ पीओकेसाठी २३ अब्ज रुपयांचा निधी मंजूर केला आहे. स्थानिक सरकारनेही विजेचे दर आणि ब्रेडच्या किंमतींमध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे.
गेल्या चार दिवसांपासून पीओकेमधील सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आणि वकिलांनी स्थापन केलेल्या संयुक्त अवामी कृती समितीने जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमती आणि कर वाढीविरोधात मुझफ्फराबादपर्यंत मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे. सोमवारीही लाखो आंदोलकांनी मुझफ्फराबादकडे लाँग मार्च सुरूच ठेवला होता. मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला, त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.
दरम्यान, रविवारी पोलीस एसआय अदनान कुरेशी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या गोंधळात १०० हून अधिक जण जखमी झाले. त्यात बहुतांश पोलीस होते. दरम्यान, आंदोलकांना शांत करण्यासाठी, पाकिस्तान सरकारने तात्काळ प्रभावाने २३ अब्ज रुपयांच्या बजेटची तरतूद केली आहे. निदर्शनांनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफही सक्रिय झाले असून त्यांनी परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
हे ही वाचा:
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे कर्करोगाने निधन
‘भारतीय सैन्यात दोन प्रकारचे शहीद आहेत’
पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या काँग्रेससोबत जाणाऱ्यांना लाज वाटायला हवी!
‘घाटकोपर दुर्घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश’
पीओकेच्या लोकांचे म्हणणे आहे की पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तानमधील लोकांना अन्न, पीठ आणि डाळ अशा मुलभूत गोष्टीही मिळत नाहीत. वीज कपात सुरू आहे. सर्वत्र भुकेने लोक मरत आहेत. पाकव्याप्त काश्मीरच्या युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टी आणि जम्मू काश्मीर संयुक्त अवामी कृती समितीने शांततापूर्ण निदर्शकांवर कोणत्याही शक्तीचा वापर न करण्याचा इशारा पाकिस्तानला दिला आहे. पण, पीओकेच्या अनेक भागांमध्ये निदर्शनांनी आता हिंसाचाराचे रूप धारण केले आहे. अशातच या निदर्शनेदरम्यान मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते. यावेळी या गर्दीत भारतीय ध्वज फडकवण्यात आल्याचे समोर आले. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि जगभर याची चर्चाही झाली.