पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांची मैत्री जगजाहीर आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे नुकतेच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीला गेले होते. चीनकडून कर्ज मिळावे या अपेक्षेने गेलेल्या इम्रान खान यांच्या हाती मात्र चीनने काहीच न दिल्याने निराशा झाली आहे. इम्रान खान आणि शी जिनपिंग यांच्या चीन दौऱ्याची बहुचर्चित भेट फारशी प्रभावी ठरलेली नाही.
हिवाळी ऑलिम्पिकच्या निमित्ताने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा यांची भेट घेऊन राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर शी जिनपिंग यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. या भेटीमधील चर्चांमधून भीषण आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला चीनकडून नवे कर्ज मिळण्याची अपेक्षा होती.
इम्रान खान यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडे तीन अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर करण्याची विनंती देखील केली आहे. मात्र, आधीच चिनी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानला आणखी कर्ज मंजूर करणे तर दूर पण ते मिळेल असे साधे आश्वासनही चीनने केलेले नाही. सर्व बैठका आणि चर्चा होऊनही पाकिस्तानला चीनकडून नवीन कर्ज मिळू शकलेले नाही.
हे ही वाचा:
राज्यसभेत लता दीदींना वाहिली श्रद्धांजली
बुटात लपवले होते ५ कोटींचे ड्रग्ज
स्पुटनिक लाइट सिंगल-डोस लसीला आपत्कालीन वापराची परवानगी
फिरकीसमोर वेस्ट इंडीजने गुडघे टेकले; हजाराव्या सामन्यात भारताचा दमदार विजय
यादरम्यान चीन- पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) च्या दुसऱ्या टप्प्यातील कामावर चर्चा झाली. सीपीईसीच्या पहिल्या टप्प्यातील अनेक कामे अद्याप पूर्ण व्हायची आहेत. सीपीईसीचे काम जवळपास दोन वर्षांपासून रखडले आहे. चीनने गुंतवलेल्या पैशाचे व्याजही पाकिस्तानला भरता येत नाही.
दोन्ही देश एकत्रितपणे बदल घडवून आणतील. चीन आणि पाकिस्तान यांच्यातील धोरणात्मक सहकार्य जगामध्ये बदल घडवून आणेल. चीन आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पूर्ण न्याय आणि पारदर्शकता राखतो. चीनचे पाकिस्तानशीही असेच संबंध आहेत. दोन्ही देश संयुक्त राष्ट्रांसह इतर आंतरराष्ट्रीय मंचावर एकत्र काम करतील, असा विश्वास चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी इम्रान खान यांच्यासोबतच्या भेटीत व्यक्त केला.