‘या’ मुद्द्यावरून झाली पाक सरकारची बोलती बंद

‘या’ मुद्द्यावरून झाली पाक सरकारची बोलती बंद


पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांच्या सरकारची बोलती बंद झाली आहे. चीनसोबतची जवळीक इम्रान सरकारला चांगलीच भोवली आहे. पाकिस्तानच्या विरोधी पक्षाने सरकारला ‘चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (सीपीईसी) च्या मुद्द्यावरून चांगलेच घेरले. पण सरकारकडे विरोधकांच्या कुठल्याच प्रश्नाचे समाधानकारक उत्तर नव्हते.

पाकिस्तानी संसदेचे अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात प्रश्नोत्तरांच्या तासाला विरोधकांनी सरकारला ‘सीपीईसी’ च्या अधिकाराच्या मुद्द्यावरून चांगलेच धारेवर धरले. ‘सीपीईसी’ महामंडळा संदर्भातील वटहुकूमाची मुदत संपली आहे, संसदेत या संबंधीचे विधेयक पारित झालेले नाही तरीही हे महामंडळ कसे कार्यरत आहे? या महामंडळाच्या प्रशासकीय आणि आर्थिक निर्णयांची कायदेशीर वैधता काय? असे सवाल उपस्थित करून विरोधकांनी इम्रान खान यांच्या सरकारला जेरीस आणले होते.

सत्ताधारी पक्षाकडे या कोणत्याच प्रश्नाचे धड उत्तर नव्हते. आक्रमक झालेल्या विरोधकांसमोर उडवाउडवीची उत्तर देत सरकारी पक्षाने वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला. ‘सीपीईसी’ महामंडळाचे सर्व निर्णय हे संबंधित मंत्रालयांच्या नियम आणि अटींप्रमाणे घेतले गेले आहेत असे सांगण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरु होता.पण आक्रमक विरोधकांसमोर त्यांचे काहीएक चालले नाही. कुठल्याच प्रश्नाचे समाधानकारक उत्तर ना मिळाल्याने संतप्त विरोधकांनी अखेर सभात्याग करण्याचा निर्णय घेतला. 

Exit mobile version