इम्रान खान यांच्या अटकेच्या तयारीमुळे पाकिस्तानात घमासान

इम्रान खान म्हणतात मी न्यायालयात स्वतःहून जाईन. आपल्याला निवडणुकीत उभे राहता येऊ नये म्हणून अटकेचे प्रयत्न

इम्रान खान यांच्या अटकेच्या तयारीमुळे पाकिस्तानात घमासान

पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इम्रान खान यांना अटक करण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर पाकिस्तानात घमासान होऊ लागले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार इम्रान यांना अटक करण्यासाठी पोलिस त्यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावरून पोलिस आणि इम्रान यांचे समर्थक एकमेकांना भिडले.

त्यांच्या घराबाहेर सध्या तणावाची स्थिती असून पोलिस इम्रान यांना अटक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. इम्रान यांच्या समर्थकांवर अश्रुधुराची नळकांडी फोडण्यात आली असून समर्थकांकडून पोलिसांवर दगडांचा मारा करण्यात येत आहे. त्यातच इम्रान यांनी आपण न्यायालयात येऊ अशी हमी दिली आहे. मात्र अटक होण्यास त्यांनी नकार दिला आहे. मात्र न्यायालयातही सुरक्षेचे तीनतेरा वाजल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कारण नुकताच तिथे अतिरेक्यांनी हल्लाही केलेला आहे.

हे ही वाचा:

कौटुंबिक लोकशाही चिरायू होवो…

चीन-पाक निर्मित JK 17 एअरक्राफ्ट खराब, म्यानमारला केला जात होता पुरवठा

पाकिस्तानी तरुणांना नकोसा झालाय त्यांचा देश!

चिनाय कॉलेजची जागा बांधकाम व्यावसायिकांना विकण्याचा घाट; प्रशासक नेमण्याची मागणी

इम्रान म्हणतात की, आपल्याला अटक करू नये अशा अर्थाचा जामीन आपण न्यायालयाकडून घेतलेला आहे. त्यामुळे शनिवारपर्यंत आपल्याला अटक करता येणार नाही. मात्र पोलिस कोणत्याही कारणाशिवाय अटक करण्यासाठी आटापीटा करत आहेत. सरकारनेही आपल्याला तुरुंगात टाकण्यासाठी कंबर कसली आहे. यापूर्वीही तसे प्रयत्न करण्यात आले होते पण ते निष्फळ ठऱले होते.

इम्रान म्हणाले की, मी मात्र तुरुंगात जाण्याची मानसिक तयारी केली आहे. किती रात्री आता तिथे काढाव्या लागतील माहीत नाही. आगामी निवडणुकात आपण सहभागी होऊ नये म्हणून आपल्याला अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण मी तुरुंगात असेन अथवा नाही माझा पक्ष जिंकल्यावाचून राहणार नाही.

पण पाकिस्तानच्या मंत्री मरियुम औरंगजेब यांनी म्हटले आहे की, या अटकेचा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही. न्यायालयाने जे आदेश दिले आहेत त्यांचे केवळ आम्ही पालन करत आहोत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. पण इम्रान खान हे आपल्या बचावासाठी कार्यकर्ते, महिला, मुले यांचा ढाल म्हणून वापर करत आहेत.

Exit mobile version