पंतप्रधानांनी मन की बातमध्ये घेतली दखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सात वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने पंतप्रधानांनी देशवासियांशी मन की बातच्या माध्यमातून संवाद साधला. त्यात त्यांनी विविध मुद्द्यांचा परामर्श घेताना कोरोनाच्या काळात भारतातील द्रवरूप ऑक्सिजनचे उत्पादन १० पटीने वाढल्याचे सांगून भारताच्या या क्षेत्रातील प्रगतीचा विशेष उल्लेख केला. या कोरोनाच्या महामारीच्या प्रारंभीच्या काळात अगदी थोड्या चाचण्या होत असत मात्र आता प्रतिदिनी २० लाख चाचण्या देशभरात होत आहेत, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी ऑक्सिजन कंटेनर वाहून नेणाऱ्या चालकांशीही संवाद साधला आणि त्यांना प्रोत्साहन दिले.
पंतप्रधान म्हणाले की, सर्वसाधारणपणे आपण ९०० मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनची निर्मिती प्रतिदिनी करतो पण आता ही निर्मिती ९५०० मेट्रिक टन इतकी झाली आहे. अर्थातच १० पटीने हे उत्पादन वाढले आहे.
परदेशातून भारतात अनेक ऑक्सिजन टॅंकर्स आणले गेले. त्यांचा पुरवठा थेट राज्यांना करण्यात आला तर विशेष ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातूनही ऑक्सिजनची गरज भागविण्यात आली.
हे ही वाचा:
मीरा चोप्रा बनावट ओळखपत्र प्रकरणाची चौकशी होणार
आधीच ‘उल्हास’; त्यात उशिरा आली जाग
योगींनी पत्रकारांना दिले, महाराष्ट्रातील पत्रकारांचे काय?
आता बस झालं…किमान वेतन द्या, दुकाने उघडा
पंतप्रधानांनी ऑक्सिजनच्या या पुरवठ्यासाठी लष्कराने केलेल्या अफाट मेहनतीचाही विशेष उल्लेख केला. भारताने जल, आकाश आणि वायू मार्गाने ऑक्सिजनचा पुरवठा केला. नवे ऑक्सिजन प्लँट्स टाकण्याचे कामही वेगाने पूर्ण झाल्याचेही ते म्हणाले.
आपल्या सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान म्हणाले की, सबका साथ, सबका विकास हे तत्त्व आम्ही कायम जपत राहणार आहोत. या साथीच्या प्रारंभी आपल्याकडे केवळ १ कोरोना चाचणी प्रयोगशाळा होती पण आता २५०० प्रयोगशाळा देशभरात आहेत. सुरुवातीला केवळ काहीशे चाचण्या होत आता त्यांची संख्या २० लाखांच्या घरात आहे. आतापर्यंत ३३ कोटी नमुने या प्रयोगशाळेत तपासण्यात आले आहेत.