भारतातील करोना संकटात ऑक्सिजनची असलेली गरज भागविण्यासाठी सिंगापूरहून मागविण्यात आलेले २५६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले आहेत. हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स जवळपास साडेपाच टन इतक्या वजनाचे असून दोन संचात ते आणले गेले. प्रत्येक संचात १२८ कॉन्सन्ट्रेटर्स होते. या यंत्राच्या सहाय्याने हवेतला ऑक्सिजन गोळा केला जातो आणि हा विशेषतः करोनामुळे घरात विलगीकरणात असलेल्या रुग्णांना उपयुक्त ठरू शकतो. किंवा रुग्णालयात जिथे ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे, तिथेही त्याचा उपयोग होऊ शकतो.
हेही वाचा:
‘तेजस’च्या भात्यात आणखी एक क्षेपणास्त्र
मोफत लशीची फक्त घोषणा, मग १ मेपासून लस का नाही?
पीएम केअर्समधून प्राणवायू संचांचा पुरवठा
लसीकरण केंद्रातील रांगांवर जालीम डोस कोणता?
करोनाच्या या काळात भारताला विदेशातून मदतीचा ओघ पाठविला जात आहे. याआधीही मंगळवारी भारतासाठी सिंगापूरहून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स पाठविण्यात आले होते. आता हा दुसरा टप्पा आहे. अवघ्या १५ मिनिटात हे सगळे कॉन्सन्ट्रेटर्स उतरविण्यात आले.
भारताला सध्या ऑक्सिजनची मोठी गरज असून नुकतीच अदानी उद्योगसमुहाने सौदी अरेबियातून ऑक्सिजनचे टँकर उपलब्ध करून दिले होते. हवाई मार्गानेही हवाई दलाच्या मदतीने केंद्र सरकारने ऑक्सिजनचे टँकर मागविले आहेत. शिवाय, देशांतर्गत उद्योगांतूनही ऑक्सिजन टँकर्सचा पुरवठा होतो आहे. मुकेश अंबानी यांच्या जामनगर, गुजरात येथील उद्योगातून १०० टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. शिवाय, ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून विविध राज्यांतूनही ऑक्सिजन टँकर्सचा पुरवठा केला जात आहे.