ऑपरेशन अजय: २३५ प्रवाशांना घेऊन दुसरे विमान भारतात दाखल

विमानात दोन लहान मुलांसह २३५ नागरिक

ऑपरेशन अजय: २३५ प्रवाशांना घेऊन दुसरे विमान भारतात दाखल

युद्धग्रस्त इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी भारताने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन अजय’अंतर्गत शनिवारी सकाळी दुसरे विमान भारतात दाखल झाले.

भारताने पाठवलेल्या विशेष विमानातून भारतीय नागरिकांचा दुसरा गट सुखरूप मायदेशी दाखल झाला. या विमानात दोन लहान मुलांसह २३५ नागरिक होते. हे सर्व प्रवासी शनिवारी सकाळी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. ‘ऑपरेशन अजय’अंतर्गत पहिले विमान शुक्रवारी सकाळी दाखल झाले होते. त्यावेळी २१२ भारतीय इस्रायलमधून भारतात आले होते. या सर्व प्रवाशांना ‘पहिले येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर निवडले जात आहे. भारतीय दूतावासाने ‘ऑपरेशन अजय’अंतर्गत सर्व भारतीयांची नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. या प्रवाशांचा परतीचा सर्व खर्च केंद्र सरकारतर्फे केला जात आहे.

युद्धग्रस्त इस्रायलमध्ये अडकलेल्या ज्या भारतीयांना मायदेशात परतायचे आहे, त्यांच्यासाठी ‘ऑपरेशन अजय’ ही मोहीम सुरू केल्याचे केंद्र सरकारने गुरुवारी जाहीर केले होते. त्याअंतर्गत ही विशेष विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. या दुसऱ्या विमानाने स्थानिक वेळेनुसार, शुक्रवारी रात्री ११ वाजून दोन मिनिटांनी उड्डाण केले. भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्याची ही मोहीम रविवारीही सुरू राहणार आहे.

‘नोंदणी केलेल्या भारतीय नागरिकांच्या पुढील गटाला दुतावासाकडून आज रात्री निघणाऱ्या विशेष विमानाची सूचना करण्यात आली आहे. त्यानंतरच्या विमानांची माहिती अन्य नोंदणी केलेल्या नागरिकांना त्या त्या विमानांनुसार कळवली जाईल,’ असे भारतीय दूतावासातर्फे ‘एक्स’वर जाहीर करण्यात आले.

बार इलान विद्यापीठात संशोधन करणाऱ्या एका विद्यापीठाने भारतात सुखरूप पोहोचल्यानंतर केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. ‘आमची युद्धग्रस्त इस्रायलमधून सुखरूप सुटका केल्याबद्दल भारत सरकारचे खूप खूप आभार. आपल्या सरकारने ‘ऑपरेशन अजय’ अंतर्गत आमची या बिकट परिस्थितीतून सुटका केली,’ अशा शब्दांत बार-इलान विद्यापीठात अझेरीली फॅकल्टी ऑफ मेडिसिन विभागात पीएचडी करणाऱ्या सूर्यकांत तिवारी याने भावना व्यक्त केल्या. विद्यार्थी, परिचारिका, आयटी व्यावसायिक आणि हिरे व्यापाऱ्यांसह सुमारे १८०० भारतीय इस्रायलमध्ये राहातात आणि काम करतात.

हे ही वाचा:

एक लाख इस्रायली सैनिकांचा गाझाला वेढा

क्रिकेटच्या २०२८ लॉस एंजलेस ऑलिम्पिक गेम्समध्ये समावेशासाठी हिरवा झेंडा

डोंबिवलीतील शाळेच्या शिक्षिकेकडून ५० ते ६० विद्यार्थ्यांना बेदम मारहाण!

भारत- पाक सामना बघायला जाणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष ट्रेन

गेल्या शनिवारी भल्या पहाटे हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केल्यानंतर सुमारे १३०० जण ठार झाले असून इस्रायलने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझा पट्टीतील १९०० जणांना जीव गमवावा लागला आहे. तर, इस्रायलमध्ये घुसलेल्या हमासच्या सुमारे १५०० दहशतवाद्यांचा खात्मा केल्याच दावा इस्रायली सरकारने आहे.

Exit mobile version