सन २००५मध्ये माजी ऑलिम्पिकपटू जॉन गुडविन यांनी अंतराळ सफरीचे तिकीट काढले होते. अखेर १८ वर्षांनंतर त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. ‘मी एक दिवस नक्कीच अंतराळसफर करेन’, हा त्यांचा विश्वास अखेर सार्थ ठरला आहे. ‘व्हर्जिन गॅलेक्टिक’ या अंतराळ पर्यटन कंपनीने गुरुवारी आपली पहिलीवहिली अंतराळ पर्यटन सहल यशस्वीपणे पूर्ण केली. या पर्यटकांमध्ये माजी ब्रिटिश ऑलिम्पिकपटूसह कॅरिबियनमधील आई-मुलीचा समावेश होता. हे अंतराळयान अमेरिकेतील स्पेसपोर्ट येथील धावपट्टीवर उतरले. या यानाने न्यू मेक्सिकोच्या वाळवंटातून उड्डाण केले होते.
या पहिल्या खासगी पर्यटकांच्या उड्डाणाला अनेक वर्षांपासून विलंब होत होता. ही सहल यशस्वी झाल्यामुळे रिचर्ड ब्रॅन्सन यांची कंपनी ‘व्हर्जिन गॅलेक्टिक’ आता दर महिना सहल आयोजित करू शकते. या कामगिरीमुळे ही कंपनी जेफ बेझोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ आणि एलोन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ या खासगी अंतराळ पर्यटन कंपनीच्या पंगतीत जाऊन बसली आहे. ‘माझ्या आयुष्यात मी आतापर्यंत केलेली ही सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट होती,’ असे जॉन गुडविन यांनी अंतराळसफरीतून परतल्यानंतर सांगितले.
८० वर्षांचे गुडविन यांनी १९७२च्या ऑलिम्पिकमध्ये कॅनोइंगमध्ये सहभाग घेतला होता. त्यांना पार्किन्सन्सचा आजार असून इतरांसाठी प्रेरणादायी काम करण्याची त्यांची इच्छा आहे. गुडविन यांनी जेव्हा अंतराळ पर्यटनाचे तिकीट काढले, तेव्हा त्याची किंमत दोन लाख अमेरिकी डॉलर होती. आता त्याची किंमत चार लाख ५० हजार डॉलर झाली आहे. तर, दुसऱ्या पर्यटक स्वीपस्टेक विजेत्या केशा शाहाफ (४६) अँटिग्वा येथील आरोग्य प्रशिक्षक असून आणि त्यांची मुलगी, अनास्ताटिया मेयर्स (१८) स्कॉटलंडच्या अबरडीन विद्यापीठातील विद्यार्थिनी आहे.
हे ही वाचा:
नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाकडून दोन महिन्यांसाठी जामीन
‘न्यूजक्लिक’ प्रकरणी ईडीची उच्च न्यायालयात धाव
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना लवकरच ईडीकडून समन्स
आपचे खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबित !
‘माझे बालपणीचे स्वप्न पूर्ण झाले आहे,’ अशी प्रतिक्रिया शाहाफ यांनी दिली. तर, ‘माझ्याकडे वर्णन करायला शब्दच नाहीत. संपूर्ण वेळ माझ्या मनात केवळ ‘व्वा’ हाच विचार होता,’ असे त्यांची मुलगी म्हणाली. अंतराळयानात कंपनीची अंतराळवीर प्रशिक्षक आणि दोन वैमानिकांपैकी एकजण महिला होती. त्यामुळे अंतराळयानात दोन पुरुष तर चार महिला होत्या. अंतराळयानात महिलांची संख्या पुरुषांची संख्या जास्त असण्याची ही बहुदा पहिलीच वेळ होती.
सन २०१८ पासूनची ‘व्हर्जिन गॅलेक्टिक’ची ही अंतराळातील सातवी सहल होती, परंतु तिकीटधारकांना घेऊन जाणारी पहिलीच. कंपनीनुसार सुमारे ८०० जण सध्या व्हर्जिन गॅलेक्टिकच्या प्रतीक्षायादीत आहेत. ‘ब्लू ओरिजिन’ने आतापर्यंत ३१ जणांना अंतराळसफर घडवून आणली आहे. तर, स्पेसएक्स ही एकमेव खासगी कंपनी आहे, जी ग्राहकांना थेट कक्षेपर्यंत नेते. मात्र या कंपनीची तिकिटे लाखो डॉलर किमतीची आहेत. नासा हा त्यांचा सर्वांत मोठा ग्राहक आहे. नासा सन २०२०पासून त्यांच्या अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आणण्यासाठी स्पेसएक्सवर अवलंबून आहे.