24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियाभविष्य उज्जवल आहे... आता दहशतवादीच पाकिस्तानला पोसणार!

भविष्य उज्जवल आहे… आता दहशतवादीच पाकिस्तानला पोसणार!

पाकिस्तानमध्ये २०२४ च्या फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीच्या रिंगणात दहशतवादी हाफिज सईद याचा पक्ष उतरला आहे.

Google News Follow

Related

पाकिस्तानच्या बाबतीत ऐकावं ते नवलच अशी परिस्थती असते. पाकिस्तानमध्ये २०२४ च्या फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीच्या रिंगणात दहशतवादी हाफिज सईद याचा पक्ष उतरला आहे. शिवाय त्याचा मुलगा तलहा सईद याने स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे जगभरात सर्वांच्याचं भुवया उंचावल्या आहेत. त्यातही भारतात याची कुजबुज जास्त आहे.

पाकिस्तान हे नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर चित्र येतं ते दहशतवादाला पोसणारा देश. पाकिस्तान हा दहशतवादाला खतपाणी घालतो; अनेक कुख्यात दहशतवादी संघटनांना पाकिस्तानने राजाश्रय दिलाय या बाबी आता जगजाहीर आहेत. फोफावणारा दहशतवाद असेल किंवा अस्थिर असणारं सरकार असेल यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली आहे. पाकिस्तानचा विक्रम आहे की तिकडच्या एकाही सरकारने त्यांचा पाच वर्षांचा काळ पूर्ण केलेला नाही. सध्याच्या घडीलाही पाकिस्तानमध्ये काही बरी परिस्थिती नाही. महागाई गगनाला भिडलीये; अंतर्गत वाद पेटलाय; राजकीय अस्थिरता आहेच. अशातच २०२४ च्या ८ फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये निवडणुका होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

राजकीय पक्ष तयारीला लागलेले असताना कुख्यात दहशतवादी हाफिझ सईद याने जाहीर केलं आहे की, त्याचा पाकिस्तान मरकजी मुस्लिम लीग म्हणजेच PMML हा पक्ष पाकिस्तानच्या निवडणुकीत उतरणार आहे. याशिवाय हाफिजच्या पक्षाने संसदीय आणि राज्यांच्या विधानसभेच्या सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचाही निर्णय घेतला आहे. त्याचा मुलगा तलहा सईद या निवडणुकीत आपलं नशीब आजमावणारे. ही नक्कीच खळबळजनक गोष्ट आहे. भारतासाठी तर जखमेवरची खपली काढण्यासारखी ही गोष्ट आहे. कारण हाफिज सईद हा २६/११ च्या मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे.

या हल्ल्याला १५ वर्ष झाली आहेत पण अजूनही एकही भारतीय  त्या भ्याड हल्ल्याला विसरू शकलेला नाही. त्याच्या काळ्या आठवणी आजही मनात खोलवर रुजून आहेत. २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी भारताच्या आर्थिक राजधानीच्या शहरावर म्हणजेच मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याने संपूर्ण देशासह जग हादरलं होतं. समुद्राच्या मार्गाने दहशतवादी मुंबईत घुसले आणि त्यांनी मुंबईतल्या मोक्याच्या ठिकाणी हल्ले केले. दीडशेहून अधिक निष्पापांचा बळी यात गेला तर शेकडोहून अधिक लोक जखमी झाले. तब्बल ६० तासांहून अधिक काळ दहशतवादी आणि पोलीस यांच्यात चकमक चालली. यातचं दहशतवादी कसाब हाती लागला आणि हल्ल्याचे धागेदोरे पाकिस्तानमध्ये असल्याचं समोर आलं. हळूहळू स्पष्ट झालं की, हाफिज सईद हा या हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. पुढे भारताने त्याच्या अटकेसाठीची मागणी लावून ठेवली होती.

हाफिज सईद हा लष्कर- ए- तोएबा या अतिरेकी संघटनेचा संस्थापक आहे. याशिवाय पाकिस्तानात तो जमात-उद-दावा ही संघटनाही चालवतो. लष्कर-ए-तोएबा या संघटनेची स्थापना १९८० च्या दशकात झाली होती. २००१ मध्ये या संघटनेला आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलं. हाफिज सईद याला संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेने ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ म्हणून घोषित केलेलं आहे. त्याच्यावर १ कोटी डॉलर्सचं बक्षीसही ठेवण्यात आलं आहे. हाफिज सईद याचा PMML हा पक्ष मिल्ली मुस्लिम लीगचा भाग आहे. मिल्ली मुस्लिम लीग ही खरं तर हाफिज सईदच्या जमात-उद-दावा या संघटनेची राजकीय शाखा आहे. २०१८ मध्ये राजकीय पक्ष म्हणून त्यावर बंदी घालण्यात आली होती. जमात-उद-दावावरही बंदी आहे. म्हणजे एका दहशतवाद्याच्या पक्षाला निवडणूक रिंगणात येऊ द्यायचं, त्याच्या मुलाला उमेदवारीचा अर्ज भरू द्यायचा त्यातही विशेष म्हणजे सईदचा मुलगा तलहा जो निवडणुकीत उभा राहिलाय तो ही काही धुतल्या तांदळासारखा नाही. त्याचंही नाव दहशतवादी कारवायांमध्ये आहे, अशी परिस्थिती पाकिस्तानात आहे. शिवाय हे पहिल्यांदा घडतंय असंही नाही. २०१८ मध्ये सुद्धा सईद याचा पक्ष निवडणुकीसाठी मैदानात उतरला होता. पण, त्यावेळी त्याच्या पक्षाला विशेष काही करता आलं नाही. जनतेने त्यांना नाकारलं. सईदचा मुलगा तलहा हा दहशतवाद्यांची भरती करतो शिवाय दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करण्याचं कामही करतो. पाकिस्तानात त्याच्या हालचालींवर कोणतही बंधन नाही. तलहा आपल्या सभांमध्ये भारत, इस्रायल, अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांविरुद्ध उघडपणे जिहादची धमकी देत असतो. शिवाय देशाला इस्लामिक कल्याणकारी राज्य बनवायचं आहे, असं त्यांच्या पक्षाचं म्हणणं आहे.

जग दहशतवादाविरोधात बोलत असताना पाकिस्तानला त्याचा काहीही फरक पडत नाही हेच चित्र आहे. २६/११ च्या हल्ल्यानंतर त्या हल्ल्याचा हाफिजचं सूत्रधार असल्याचं स्पष्ट झाल्यावर जागतिक दबावामुळे हाफिजला अटक करण्यात आली. अर्थात पाकिस्तानला काही ते मनापासून करायचं नव्हतं. पण जागतिक दबाव आहे म्हणून अटक केली. पण, त्यानंतर त्याची जी बडदास्त ठेवली गेली ते पाहता ही अटक म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या डोळ्यांत फेकलेली धूळ होती. हाफिजला पाकिस्तानने दोन वेळा २००८ आणि २००९ मध्ये त्याच्या राहत्या घरी स्थानबद्ध केलं होतं. पण दोन्ही वेळेला पाकिस्तानचं सर्वोच्च न्यायालय हाफिजच्या मदतीला धावलं आणि हाफिजला मोकळं रान मिळत गेलं. भारतावर चिखलफेक करत राहणं, धमक्या देणं अशा कुरापती त्याच्याकडून सुरूचं होत्या. २०२१ मध्ये, पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने हाफिज सईदला दहशतवादी वित्तपुरवठा केल्याच्या दोन प्रकरणांमध्ये ३२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. २६/११ मुंबई हल्ल्याच्या या मास्टरमाइंडला एकूण सात प्रकरणांमध्ये ६८ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पण, पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI च्या देखरेखीखाली तो तुरुंगात न राहता घरीच राहत असल्याच्या बातम्या आहेत. आता खरे काय आणि खोटे काय हे पाकिस्तान मधल्या सरकारला आणि ISI लाच माहित.

जगभरातल्या निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण म्हणजे पाकिस्तान. आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादाला विरोध करायचा आणि दुसरीकडे पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना सुरक्षा द्यायची असे धंदे पाकिस्तान आधीपासून करत आला आहे. अगदीच दाबाव आला तर दिखाव्यासाठी दहशतवाद्याला अटक करायची आणि नंतर सुटका करायची. म्हणजे मी मारल्या सारखं करतो आणि तू रडल्या सारखं कर. त्यात चीन सारखा देश पाकिस्तानच्या या कुरापतींना खतपाणी घालत असतो.

पाकिस्तान आणि चीन यांचे चांगले संबंध आहेत हे जगजाहीर आहे. चीनच्या आर्थिक मदतीवर पाकिस्तानची गुजराण होते असते. दुसरीकडे भारत- पाकिस्तान असेल किंवा भारत- चीन असेल या देशांचे संबंध ताणलेले आहेत हे सुद्धा स्पष्ट आहे. पण दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानची प्रत्येकवेळी पाठराखण करणं म्हणजे दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासारखं आहे. म्हणजे थोडक्यात पाकिस्तानला मदत करून भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न चीन करतोय. एकीकडे दहशतवादाविरोधात भूमिका घ्यायची आणि जेव्हा त्यासाठी पावलं उचलायची वेळ येते तेव्हा मात्र पाऊल मागे टाकायचं. गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या मुद्द्यावर चीनच्या भूमिकेची पुनरावृत्ती याच पद्धतीने होताना दिसतेय.

पाकिस्तानस्थित काही दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याच काम चीनने अगदी नित्यनेमाने केलेलं आहे. भारत आणि अमेरिका या दोन देशांनी संयुक्तपणे लष्कर-ए-तोयबाचा उपप्रमुख अब्दुल रहमान मक्की याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात यावं यासाठी संयुक्त राष्ट्रात म्हणजेच युनायटेड नेशन्समध्ये प्रस्ताव ठेवला होता. भारत आणि अमेरिका दोन्ही देशांनी त्याला देशांतर्गत कायद्यांनुसार दहशतवादी म्हणून घोषित केलेलं आहे. जेव्हा अमेरिकेसह भारताने मक्की याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी सुरक्षा परिषदेच्या समिती अंतर्गत संयुक्त ठराव सादर केला तेव्हा हा प्रस्ताव भारताने सर्व सदस्यांमध्ये प्रसारित केला होता. याला इतर देशांनी पाठिंबा सुद्धा दिला पण, मक्कीला जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्याच्या प्रस्तावावर चीनने अखेरच्या क्षणी आडकाठी घातली. तांत्रिक अडथळा आणला म्हणजेच टेक्निकल होल्ड आणला. मक्कीविरुद्ध पुरेसे पुरावे असूनही केवळ हेकेखोरवृत्तीने चीनने त्याला या यादीत टाकण्याला विरोध केला. हा अब्दुल रहमान मक्की हा हाफिज सईद याचा मेहुणा आहे. शिवाय लष्कर-ए-तोएबाच्या अनेक कारस्थानांचं याने म्होरक्या म्हणून काम पाहिलेलं आहे. शिवाय लष्कर-ए-तोएबासाठी फंड मिळवण्याचं काम करण्यामध्ये मक्कीची भूमिका होती. दहशतवादी संघटनेमध्ये तरुणांची भरती करायची, त्यांना कट्टरपंथी बनवायचं, हल्ल्याची योजना आखायची अशी कामं हा मक्की करायचा. विशेषतः जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचार घडवण्यामध्ये याची प्रमुख भूमिका होती.

यापूर्वीही पाकिस्तानस्थित आणि संयुक्त राष्ट्रांकडून निषिद्ध असलेली दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याला सुद्धा ग्लोबल टेररिस्ट म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावावर चीनने रोख आणला होता. भारताने जेव्हा जेव्हा अझहरला ग्लोबल टेररिस्ट म्हणून घोषित करण्यासाठी प्रस्ताव मांडला तेव्हा चीनने त्याला खोडा घातला आहे. लष्कर- ए- तोयबाचा दहशतवादी साजिद मीर यालाही चीनने पाठीशी घातलं आहे.

नुकत्याच समोर आलेल्या अहवालानुसार, जम्मू- काश्मीरमध्ये लष्करावर हल्ला करण्यासाठी दहशतवादी चीनने निर्मिती केलेली शस्त्र वापरतात हे उघड झालं आहे. दहशतवादी संघटना लष्करावर हल्ला करण्यासाठी चिनी शस्त्र, बॉडीसूट कॅमेरे आणि संपर्क साधनं वापरतात. पाकिस्तानी लष्कराला चीनकडून शस्त्र, कॅमेरे आणि दळणवळणाची साधने नियमितपणे मिळतात, परंतु, पाकिस्तान; भारतात घुसखोरी करण्यासाठी आणि दहशतवादी हल्ल्यांसाठी या दहशतवादी संघटनांना ही साहित्य उपलब्ध करून देतात हा मुद्दासुद्धा यामुळे अधोरेखित होतो आहे.

आज दहशतवादाचा धोका हा फक्त भारतालाचं नाहीये. इतर देशांनाही हा धोका तितकाच आहे आणि पाकिस्तानसारख्या दहशतवादाला पोसणाऱ्या देशालाही आहे. यावर्षी पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १ हजाराहून अधिक लोकांचे बळी गेले आहेत. त्यात तर साडेतीनशे पेक्षा जास्त तर सुरक्षा दलांचे सैनिक आहेत. घातपाती कारवायांमध्ये वाढ झाल्याचं पाकिस्तानची सरकारी आकडेवारीच सांगते. एकीकडे आपणच दहशतवादाचा बळी आहोत, असा कांगावा करायचा आणि दुसरीकडे हीच विषारी पिल्लावळ पोसत बसायचं, असा दुटप्पीपणा पाकिस्तानने वर्षानुवर्षे केला आहे. पाकिस्तानच्या या दहशतवादीधार्जिणेपणाची सर्वाधिक किंमत भारताला मोजावी लागली आहे. भारतद्वेषावर आधारलेले राष्ट्रीय धोरण अखेर अंगलट येत आहे.

आज पाकिस्तान अराजकाच्या उंबरठ्यावर आहे. महागाईने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे आणि लष्कराच्या प्रभावात असलेले सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरत आहे. चीनच्या मदतीने जी काही विकासकामे सुरू होती, ती देखील रखडली आहेत. डबघाईला आलेल्या या मित्रदेशाला मदतीचा हात चीनने आखडता घेतला असून अन्यत्र अर्थसहाय्य मिळणं कठीण बनलंय. दहशतवादाला पोसता पोसता राज्यकारभारावरचं लक्ष उडाले की अशी अवस्था होणारच होती. पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटनांकडे आज आधुनिक शस्त्र आहेत आणि आता ही पाकिस्तानसाठीचं डोकेदुखी ठरताना दिसतं आहे.

हे ही वाचा:

बब्बर खालसा इंटरनॅशनलचा नेता भारताकडून दहशतवादी घोषित

रशियाने युक्रेनवर १२२ क्षेपणास्रं डागली; ३१ नागरिक ठार

अभिषेक सोहळ्यापूर्वी राम मंदिराच्या प्रतिकृतीची प्रचंड विक्री!

अयोध्येत महर्षि वाल्मिकी विमानतळ, प्रभू रामचंद्रांच्या आगमनाचे चित्र!

पाकिस्तानमधल्या जनमानसात सरकार विरोधात भूमिका निर्माण होताना दिसते आहे. त्यांना विकास हवा आहे. सुखी समाधानी आयुष्य हवं आहे. इतर देशांच्यासोबत विकासाच्या स्पर्धेत धावायचं आहे. पाकिस्तानमधले अहवाल असतील; लोकांच्या प्रतिक्रिया असणारे व्हिडीओ असतील यातून हीच भावना दिसून येते आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखं खमकं नेतृत्व त्यांना हवं आहे. भारत आणि पाकिस्तान एकत्रच स्वतंत्र झालेले दोन देश; पण दोन्ही देशांमधील तफावत म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे, असं तिकडच्या लोकांना आता वाटू लागलंय आणि लोक त्यावर आपली मतं मांडू लागलीत.

हाफिजचा पक्ष निवडणुकीत उतरलाय; त्याचा मुलगा उमेदवार म्हणून पुढे आला आहे. पाकिस्तान दहशतवादाला पोसतोय असं म्हटलं जातं पण आता दहशतवादी पाकिस्तानला पोसतील असं म्हणायची वेळ आली आहे. खरंतर हाफिजला २०१८ मध्येही यश मिळालं नव्हतं आणि आताही ते मिळेल असं वाटत नाही. पण पाकिस्तानची भविष्यातील वाटचाल कोणत्या दिशेने होणार हे निवडणूक झाल्यावर आणि निकाल समोर आल्यावरचं स्पष्ट होईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा