रंगकर्मींनी सोमवारी दादासाहेब फाळके यांच्या स्मारकाजवळ सोमवारी आंदोलन केले. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कलाकारांच्या समस्या शासनापर्यंत पोहचवण्यासाठी ‘रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र’ तर्फे मंगळवारी अभिनेते विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली. या बैठकीत रंगकर्मींच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, तरी त्यांच्या समस्यांबाबत झटपट निर्णय काही लागलेला नाही. आणखी काही काळ त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नाट्यगृहे व चित्रपटगृहे १ सप्टेंबरपासून खुली करण्याबाबत सरकार दरबारी हालचाली सुरू आहेत. एकपात्री किंवा दोन ते तीन लोकांच्या मदतीने मोकळ्या जागेत किंवा सोसायटीच्या आवारात होणाऱ्या कलांना तत्काळ परवानगी मिळावी. वासुदेव, पिंगोळा, पोतराज आणि नंदीबैल अशा कलांच्या संबंधित कलाकारांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली होती. कोरोनाच्या काळात विविध घटकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला, तीच वेळ रंगकर्मींवरही दुर्दैवाने आली.
हे ही वाचा:
लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्, अशी ठाकरे सरकारची चंपी
आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो?
ज्या रंगकर्मींच्या मुलांना शाळेची फी न भरल्यामुळे शाळेतून काढून टाकण्यात आले होते, अशा विद्यार्थ्यांची यादी करून ती संबंधित शिक्षण संस्थांना देऊन हा प्रश्न निकाली लावण्यात आला आहे. नाट्यगृहे व चित्रपटगृहे १ सप्टेंबरपासून सुरू करण्याचा प्रस्तावावर अजून विचार चालू आहे. या बैठकीत विजय राणे, मेघा घाडगे, संचित यादव, सुभाष जाधव, चंद्रशेखर सांडवे, उमेश ठाकूर, शीतल माने आणि अमिता कदम हे उपस्थित होते.