सावधान! रस्त्यावर थुंकणाऱ्याला करावी लागणार सेवा

सावधान! रस्त्यावर थुंकणाऱ्याला करावी लागणार सेवा

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अधिक कठोरपणे केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास पूर्वी २०० रुपये दंड आकारला जात असे. मात्र आता १२०० रुपयांचा दंड आणि ही रक्कम भरता येणार नसेल तर किमान एक तास समुदाय सेवा करावी लागणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कोरोनाचा धोका अधिक वाढतो. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी त्यासंबंधी माहिती देणारी कॉलर ट्यून वाजवण्यात येईल तसेच इतर माध्यमांमधूनही जागृती केली जाईल असे पालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. २ ऑगस्टपर्यंत केलेल्या कारवाईतून पालिकेने ३९ लाख रुपये दंड वसूल केला आहे.

हे ही वाचा:

लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित

मंत्री उदय सामंतांचा भाऊ कोकणचा सचिन वाझे?

अनुपस्थित खासदारांचा मोदी घेणार तास?

औरंगाबादमधील उद्योगांवर ‘गुंडां’तर

पालिकेने न्यायालयात जनजागृती करणारे आणि कारवाई काय असेल याची माहिती देणारे फलक सादर केले आहेत. हे फलक मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये असतील. दंडाची किंमत २०० रुपयांवरून १२०० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसा प्रस्ताव मुख्य लेखा अधिकाऱ्याकडे पाठवण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कायदा असूनही कठोर कारवाई केली जात नाही अशी याचिका अ‍ॅड. अर्मिन वांद्रेवाला यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे.

या समस्येला आळा घालण्यासाठी प्रत्येक विभागात ३० मार्शल तैनात करणार आहे. मोबाईल व्हॅनच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी आणि झोपडपट्ट्यांमध्ये जागरुकता केली जाईल. थुंकणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी ५२ डिटेक्टर असणार आहेत. तसेच थुंकणाऱ्यांची तक्रार करण्यासाठी १९१६ हा क्रमांक सुरू केले आहे. ‘थुंकू नये’ ही मोहीम राबवताना बेस्ट, रिक्षा आणि टॅक्सी चालक यांना स्वतः आणि प्रवाशांना थुंकण्यापासून रोखण्याचे आवाहन करण्यात आले आहे असे पालिकेने म्हटले आहे.

Exit mobile version