रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात औटघटकेचे बंड पुकारणाऱ्या ‘वॅगनर’ या सशस्त्र गटाचा प्रमुख प्रिगोझिन याने आमचा उद्देश सरकार उलथवून टाकण्याचा नव्हता. तर, ते केवळ निषेध व्यक्त करण्याचा होता,’ असे स्पष्ट केले आहे. प्रिगोझिन याने ११ मिनिटांचा ऑडिओ संदेश देऊन त्यात स्वत:ची बाजू मांडली आहे.
शनिवारी रात्री येवगेनि प्रिगोझिन त्याच्या सशस्त्र गटासह शहरातून माघार घेत असताना एसयूव्हीमध्ये दिसला होता. तेव्हा तो लोकांशी हस्तांदोलन करत तसेच हसताना दिसत होता. रक्तपात टाळण्यासाठीच आपल्या सैनिकांनी माघार घेतली असल्याचे स्पष्टीकरण प्रिगोझिन याने दिले आहे.
‘आम्हाला केवळ निषेध व्यक्त करायचा होता. सरकार उलथवून टाकायचे नव्हते. आम्ही याआधी ज्या गोष्टींवर चर्चा केली, त्याच आम्हाला याद्वारे दाखवून द्यायच्या होत्या. देशाची सुरक्षा ही गंभीर समस्या आहे,’ याकडे त्याने लक्ष वेधले. आम्हाला आमच्या ‘वॅगनर’ गटाचा रक्तपात होऊ द्यायचा नव्हता. रशियाच्या भूभागावर झालेल्या संघर्षात आमच्या सैनिकांचा कोणताही सहभाग नव्हता, असा दावाही त्याने केला. मात्र त्यांच्या दिशेने मारा केलेले रशियन क्षेपणास्त्र नेस्तनाबूत केल्याबद्दल प्रिगोझिन याने खंत व्यक्त केली.
हे ही वाचा:
पालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अनिल परबांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मणिपूरमध्ये सैनिकांच्या कामात महिलांचा अडथळा
१५ ऑक्टोबरला भारत पाकिस्तान भिडणार
अनधिकृत शाखा तोडल्यामुळे ठाकरे गटाचा थयथयाट
‘मॉस्कोजवळ रशियन सैन्य तैनात केल्याचे समजल्यावर आम्ही थांबलो. पुढील रक्तपात टाळण्यासाठी आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला,’ असे तो म्हणाला. मात्र त्याने आपण आता कुठे आहोत, याचा थांगपत्ता लागू दिला नाही. तसेच, रशियन सरकारसोबत त्याचा काय करार झाला, जेणेकरून त्याने हे बंड थांबवले, हेही त्याने सांगितले नाही. शनिवारी प्रिगोझिन याने तो बेलारूससाठी निघत असल्याचे जाहीर केले होते. मात्र प्रिगोझिनविरुद्ध दाखल केलेले गुन्हे अद्याप मागे घेतले गेले नसल्याचे वृत्त रशियातील वृत्तपत्रांनी दिले आहे.