प्रख्यात तबलानवाज उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाचे वृत्त रविवारी रात्री सगळीकडे प्रसिद्ध झाले मात्र त्यात तथ्य नसून त्यांना सॅन फ्रॅन्सिस्को येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे स्पष्टीकरण त्यांचे पुतणे आमीर औलिया यांनी दिले.
दरम्यान, प्रसिद्ध गायक पंडित जसराज यांच्या कन्या दुर्गा जसराज यांनी झाकीर यांच्या पत्नीशी संपर्क केला. तेव्हा झाकीर यांना फुफ्फुसाचा त्रास असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या फुफ्फुसातील स्नायूंची जाडी वाढली असून त्यावर वणही उमटले आहेत. याला फायब्रोसिस असेही म्हणतात. त्यामुळे त्यांची प्रकृती नाजूक बनली आहे.
रविवारी रात्री ७३ वर्षीय झाकीर हुसेन यांचे निधन झाल्याची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली आणि त्यांना श्रद्धांजली वाहणारे अनेक मेसेज फिरू लागले. पण त्यांचे पुतणे आमीर औलिया यांच्या नावाने असलेल्या एक्सवरील अकाऊंटवरून हे वृत्त खोटे असल्याचे सांगण्यात आले. ते सॅन फ्रॅन्सिस्को येथील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे स्पष्टीकरण देण्यात आले. तसेच अशा बातमी प्रसिद्ध करू नका आणि ज्यांनी केल्या असतील त्यांनी त्या काढून टाकाव्यात असे आवाहनही त्यांनी केले.
हे ही वाचा:
संभलमध्ये मशिदी-मदरशांमधून १.३० कोटी रुपयांची वीज चोरी!
३९ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, सर्वसमावेशक मंत्रिमंडळ
सुनील पालचे अपहरण करणारा आरोपी गजाआड!
‘राम मंदिर बांधणाऱ्यांचा सन्मान झाला, ताजमहाल बांधणाऱ्यांचे हात कापले गेले’
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या वृत्तानंतर झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या योगदानाविषयीही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले. मात्र नंतर ती पोस्ट काढून टाकण्यात आली. एएनआय या न्यूज एजन्सीने झाकीर हुसेन यांच्या कुटुंबाशी संपर्क साधल्यानंतर झाकीर यांच्या प्रकृतीबद्दल सॅन फ्रॅन्सिस्को दुतावास तसेच रुग्णालय किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून अधिकृत माहिती आलेली नाही, असे सांगण्यात आले.
प्रख्यात तबलावादक उस्ताद अल्लारखा यांचे झाकीर हे पुत्र आहेत.
आमीर औलिया यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, झाकीर हुसेन यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्यासंदर्भात कुणीही ऐकीव माहिती प्रसारित करू नये. सगळ्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी प्रार्थना करावी. त्यांची स्थिती गंभीर आहे, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीला आराम पडावा यासाठी प्रार्थना करा.
झाकीर यांच्या व्यवस्थापक निर्मला बच्चानी यांनीही स्पष्ट केले की, झाकीर यांना रक्तदाबाची समस्या जाणवत होती.
दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनी झाकीर यांच्या मृत्यूच्या बातमीवरून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वसर्मा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा समावेश आहे.