पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर देशभर जाळपोळ करणारे दंगलखोर इम्रान यांच्या निवासस्थानी असल्याचा आरोप करत पोलिस त्यांच्या घरी घुसले. मात्र केवळ चहा-बिस्कीट खाऊन ते रिकाम्या हाती परतल्याचे उघडकीस आले आहे.
पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या लाहोरमधील घरात लपलेल्या दंगलखोरांना सोपवण्याची मागणी पाकिस्तानी पोलिसांनी केली होती. ही मुदत गुरुवारी संपल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी त्यांच्या घरी शोध घेण्यासाठी ‘सर्च वॉरंट’ मिळवले. पोलिस त्यांच्या घरी घुसलेही. परंतु हे पोलिस तिथे चहा-बिस्कीट खाऊन परतल्याचे समजते. अर्थात इम्रान यांच्या निवासस्थानी अद्याप कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.
गुरुवारी पीटीआयच्या नेतृत्वाखाली चर्चा करण्यासाठी एका पथकाला पाठवल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले. पोलिस अधीक्षक पदावरचा एक अधिकारी इम्रान यांच्या घरी गेलेल्या पथकाचे नेतृत्व करत आहे. या पथकात एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश आहे. डॉन वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, निवासस्थानाचे प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचा मार्ग या दोन्ही ठिकाणी तपास सुरू आहे. या पथकाचा मुख्य उद्देश घरात लपलेल्या दंगलखोऱ्यांना शोधणे हा आहे.
हे ही वाचा:
दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची काय आहेत कारणे?
चंद्राबाबू म्हणतात, दोन हजार नोटांवरील बंदीचा निर्णय उत्तम
केजरीवाल यांच्या आनंदावर केंद्र सरकारने फिरवला बोळा
यशस्वी जयस्वालला आता रोखता कामा नये!
९ मे रोजी इम्रान यांना अटक झाल्यानंतर ज्यांनी जिना हाऊसमध्ये घुसून नासधूस केली, शहरभर जाळपोळ केली अशा दंगलखोरांचा शोध पोलिस घेत आहेत. असे सुमारे ३० ते ४० दंगलखोर इम्रान यांच्या घरी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तर, इम्रान यांच्या घरातून पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा दंगलखोरांना अटक केल्याचा दावा लाहोरच्या पोलिस अधिकाऱ्यांनी केला. ही मोहीम रात्री उशिरापर्यंत चालेल, असे पोलिसांनी सांगितले.
इम्रान यांना अटकपूर्व जामीन
इम्रान यांच्या अटकेनंतर उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी त्यांच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात पाकिस्तान दहशतवादविरोधी न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायालयाने त्यांना २ जूनपर्यंत दिलासा देताना इम्रान यांना तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.