अंधश्रद्धा पसरवल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी बागेश्वर धामचे पीठाधीश्वर ‘पंडित धीरेंद्र शास्त्री’ यांना आज क्लीन चिट दिली आहे. नागपूरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीची चौकशी करूनही बागेश्वर बाबावर अंधश्रद्धा पसरवल्याचा कोणताही पुरावा सापडला नसल्याची माहिती नागपूर पोलिसांनी आज दिली आहे. पोलिसांनी चौकशी नंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीला लेखी उत्तरही पाठवले आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी सांगितले की, धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ बारकाईने पाहण्यात आले असता त्यांच्या नागपुरातील कार्यक्रमादरम्यान कोणतीही अंधश्रद्धा पसरवली जात नसल्याचे आढळून आले.आहे.
काय म्हणाले पोलीस आयुक्त?
श्याम मानव यांच्या तक्रारीला उत्तर देताना नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘ नागपुरातले आठ जानेवारीचे सगळे व्हिडिओ बारकाईने पाहण्यात आले. या व्हिडिओंद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा पसरवली जातेय असं दिसून येत नाही. किंवा अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं उल्लंघन झालंय, असं दिसून आलं नाही, या निष्कर्षाप्रत आम्ही पोहोचलो आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
हे ही वाचा:
मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट दिले होते, पण…फडणवीस काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे भागम भागचा तिसरा भाग
श्याम मानव यांची प्रतिक्रिया काय?
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. नागपूरमध्ये बागेश्वर बाबा यांचा दिव्य दरबार भरला होता त्यात त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांना अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू होतो, असा दावा श्याम मानव यांनी केला आहे. महाराष्ट्रात हा कायदा लागू असल्याने बागेश्वर बाबांचे दावे प्रसारित करणाऱ्यांनाही हा कायदा लागू होतो. त्यासाठी समान शिक्षेची तरतूद आहे, असा इशाराही श्याम मानव यांनी दिला आहे.या प्रकरणी पोलिसांनी योग्य कारवाई नाही केली तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत जाण्याची तयारी असल्याचं श्याम मानव यांनी सांगितलंय.