आता विचित्र आवाज करणाऱ्या आणि धुर ओकणाऱ्या जनरेटर डब्यांपासून मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मुक्ती मिळणार आहे. मध्य रेल्वेने आता हेड ऑन जनरेशन तंत्रज्ञान अंमलात आणल्याने गाड्यांमध्ये हा मोठा बदल होणार आहे. याबरोबरच रेल्वेची मोठी बचतही होणार आहे.
नवीन एचओजी पद्धतीमुळे गाडीच्या दोन्ही टोकांना लागणाऱ्या जनरेटर डब्यांची गरज पडत नाही. एचओजीमुळे गाडी थेट विद्युतवाहक तारेतून वीज खेचते आणि डब्यातील विविध उपकरणांसाठी वापरली जाते. त्यामुळे डब्यातील एसी, प्लग, दिवे थेट विद्युतवाहक तारेतून होणाऱ्या विजपुरवठ्यावर चालतात.
‘मिड डे’ने दिलेल्या सविस्तर बातमीनुसार, मध्य रेल्वेने त्यांच्याकडच्या ५८ गाड्यांच्या सर्वच्या सर्व ६३ डब्यांना या यंत्रणेसाठी सज्ज केले आहे. आता केवळ तीन- चार गाड्यांना अद्ययावत करणे बाकी आहे.
रेल्वेच्या एका उच्चाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या प्रणालीमुळे विद्युतभारीत तारेतून वीज खेचून ती गाडीच्या सर्व डब्यातील सर्व उपकरणांना पुरवली जाते. यापुर्वी गाडीच्या दोन्ही टोकांना दोन जनरेटर डबे लावणं आवश्यक असे. आता केवळ एकाच जनरेटर डब्याची गरज पडेल. या डब्यांच्या त्रासदायक आवाजापासून आणि धुरापासून प्रवाशांची सुटका होईल. शिवाय डिझेलच्या वापरात देखील बचत होईल.
एचओजी प्रणालीच्या सहाय्याने मध्य रेल्वेने नोव्हेंबरमध्ये ₹५.५९ कोटींची बचत केली तर ₹६.७२ कोटी डिसेंबर मध्ये वाचवले, प्रमुख जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यापुढे देखील अशा प्रकारची प्रणाली वापरात आणल्याने स्वच्छ पर्यावरणाचे लक्ष्य गाठण्यासाठी रेल्वेला मदतच होईल.
पश्चिम रेल्वेने देखील त्यांच्याकडील ६७ गाड्यांचे एचओजीसाठी परिवर्तन करण्याचे काम मागील वर्षीच पूर्ण केले आहे.