‘हिंसेला माफी नाही, कोणतीही हिंसा अस्वीकारार्ह’

अमेरिकेकडून भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्यांचा निषेध

‘हिंसेला माफी नाही, कोणतीही हिंसा अस्वीकारार्ह’

अमेरिकेतील विविध भागांत भारतीय आणि भारतीय-अमेरिकी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यांबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या प्रशासनाने ठोस बाजू मांडली आहे. ‘हिंसेचे कोणतेही कारण योग्य ठरू शकत नाही. वंश, लिंग, धर्म किंवा कोणत्याही घटकांवर आधारित असलेली हिंसा खपवून घेतली जाणार नाही. अशा प्रकारची हिंसा अमेरिकेत अस्वीकारार्ह आहे,’ अशी स्पष्टोक्ती व्हाइट हाऊसमधील नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलमधील स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्सचे समन्वयक जॉन किर्बी यांनी केली. भारतातील विद्यार्थ्यांवरील हल्ल्यांच्या मालिकेबद्दल त्यांना विचारले असता, त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

‘अशा प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी आम्ही राज्य आणि स्थानिक प्राधिकरणांसोबत काम करण्यासाठी सर्व काही करत आहोत. राष्ट्रपती आणि हे प्रशासन यासाठी खूप कठोर परिश्रम घेत आहेत आणि जो कोणी हिंसेचा विचार जरी करेल, त्यांना योग्यरित्या जबाबदार धरले जाईल,’ असे किर्बी म्हणाले.

अमेरिकेत गेल्या काही आठवड्यांत किमान चार भारतीय अमेरिकी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये अर्धवेळ काम करणाऱ्या विवेक सैनी या विद्यार्थ्याचा जानेवारीमध्ये लिथोनिया, जॉर्जिया येथे एका व्यसनी व्यक्तीने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. इंडियाना वेस्लेयन विद्यापीठात सय्यद मजहीर अली या भारतीय विद्यार्थ्यावर फेब्रुवारीमध्ये प्राणघातक हल्ला झाला होता.

युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय अर्बाना-चॅम्पेनचे अकुल धवन आणि पर्ड्यू युनिव्हर्सिटीचे नील आचार्य यांचा जानेवारीत मृत्यू झाला. सिनसिनाटी येथील लिंडनर स्कूल ऑफ बिझनेसमधील भारतीय वंशाचा विद्यार्थी श्रेयस रेड्डी बेनिगेरी या महिन्यात ओहायोमध्ये मृतावस्थेत आढळून आला.

हे ही वाचा:

‘ती माझी चूक होती’

रोहित, जाडेजाच्या शतकांमुळे भारताची दमदार सुरुवात

हवामानाचा अचूक अंदाज मिळणार; इस्रोकडून अत्याधुनिक उपग्रहाचे प्रक्षेपण

अराजकाचा नवा डाव; किसान आंदोलन ०.२

भारतीय अमेरिकन समुदायाचे नेते अजय जैन भुटोरिया यांनी वेगळ्या घटनांमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या या मृत्यूमुळे अत्यंत दुःख व्यक्त करून अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्यांसाठी वाढीव सुरक्षा उपायांची तातडीची गरज अधोरेखित केली. महाविद्यालयीन अधिकारी आणि स्थानिक पोलिसांनी ही आव्हाने तातडीने हाताळली पाहिजेत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

Exit mobile version