इस्रायल आणि हमास दरम्यान गेल्या महिनाभरापासून तीव्र संघर्ष सुरू आहे. इस्रायलचे सैन्य गाझामध्ये तीव्र बॉम्बवर्षाव करत आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत इस्रायलने केलेल्या बॉम्बहल्ल्यात २१४ नागरिकांचा जीव गेला आहे. मात्र इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी युद्धविरामाच्या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. ओलिसांच्या मुक्ततेशिवाय कोणत्याही परिस्थितीत युद्धविराम केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
उत्तर गाझामधून हमासच्या दहशतवाद्यांना उपटून काढल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षण दलाने केला आहे. ‘आम्ही ५० हजार गाझावासींना गाझाच्या उत्तर भागातून दक्षिणेकडे जाताना पाहिले. हमासने उत्तर भागातील आपले नियंत्रण गमावले असल्यानेच हे लोक पळत आहेत,’ असे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. गाझामधील पॅलिस्टिनी नागरिकांना दक्षिण गाझामध्ये जाण्यासाठी परवानगी देत आहोत, असे इस्रायलच्या सैन्यातर्फे सांगितले जात असेल तरी मानवाधिकार संघटनेनुसार, त्यांच्या गटांवरही हल्ला केला जात असल्याने ते घाबरले असल्याचा दावा केला आहे. इस्रायलने हमासविरोधात पुकारलेल्या युद्धात आतापर्यंत १० हजार ५६९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, इस्रायलमध्ये १४०० जण मारले गेले आहेत.
हे ही वाचा:
बागेश्वर धामच्या दरबारात जमीर शेख कुटुंबीयांची हिंदू धर्मात घरवापसी
आयपीएस अधिकाऱ्यासह तीन पोलिसांवर विभागीय कारवाईचे निर्देश
आरक्षणाला विरोध करणाऱ्या तरुणाला मराठा आंदोलकांकडून चोप
झोपण्याची दोन इंच जागा कमी झाल्याने कैद्यांची न्यायालयात धाव
जगभरातून युद्ध थांबवण्याची मागणी
गाझामधील पॅलिस्टिनी नागरिकांची होरपळ पाहून जगभरातून हे युद्ध थांबवण्याची मागणी केली जात आहे. अमेरिकेत १००हून अधिक कर्मचाऱ्यांनी यूएस कॅपिटल इमारतीसमोर जमून निदर्शने केली. अमेरिकेच्या संसदेतही काही सदस्यांनी युद्धविरामाचे आवाहन केले. मात्र बायडेन सरकारने युद्धविरामाचे समर्थन करण्याच्या लोकप्रतिनिधींचा दबाव झुगारून दिला.