ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात युद्धविराम नाही

इस्रायल, अमेरिकेने वृत्त फेटाळले

ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात युद्धविराम नाही

इस्रायल, हमास आणि अमेरिकेमधील चर्चा यशस्वी झाली असून ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात इस्रायलने तात्पुरत्या युद्धविरामाची तयारी दर्शवल्याचे वृत्त वॉशिंग्टन पोस्टने दिले होते. मात्र इस्रायल आणि अमेरिकेने हे वृत्त फेटाळले आहे.

 

हमासने इस्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी हल्ला केल्यानंतर २४० जणांना ताब्यात घेऊन गाझा पट्टीत ओलिस ठेवण्यात आले होते. या ओलिसांची सुटका होत नाही तोपर्यंत युद्धविरामाची घोषणा केली जाणार नाही, अशी ठाम भूमिका इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी घेतली होती. मात्र त्यानंतर अमेरिकेने यशस्वी मध्यस्थी केल्याने इस्रायल आणि हमासदरम्यान ओलिसांच्या बदल्यात तात्पुरत्या युद्धविरामाचा करार जवळपास होऊ घातला आहे, असे वृत्त वॉशिंग्टन पोस्टने दिले होते. मात्र पंतप्रधान नेतान्याहू यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. अशा प्रकारचा कोणताही करार झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ओलिसांच्या सुटकेसंदर्भात असा काही करार झाल्यास इस्रायलच्या नागरिकांना त्याबाबत लगेचच माहिती दिली जाईल, असे नेतान्याहू यांनी सांगितले.

हे ही वाचा:

पुण्यात कोयता गँगची दहशत; पाठलाग करत इमारतीच्या छतावर तरुणाची हत्या

‘मेड इन इंडिया’ अंतर्गत एचपी, डेल सारख्या कंपन्या भारतात उत्पादन करणार

भारत पराभूत झाला, पण ऑस्ट्रेलिया का जिंकली?

भारताने लष्कर मागे घ्यावे, मालदीवने केली विनंती

 

व्हाइट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रवक्ते ऍड्रीन वॉटसन यांनीही आम्ही अशा प्रकारचा कोणत्याही करार झाला नसल्याचे स्पष्ट करत हा करार होण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देश इस्रायलने गाझा पट्टीत तातडीने युद्धविराम घोषित करावा, असे आवाहन करत आहेत. कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरेहमान अल-थानी यांनीही लवकरच इस्रायल आणि हमास दरम्यान ओलिसांच्या सुटकेसंदर्भात करार होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

 

हा करार व्हावा, यासाठी कतारचे प्रतिनिधी मध्यस्थ म्हणून काम करत असून ५० ओलिसांच्या सुटकेसाठी तीन दिवसांच्या युद्धविरामावर एकमत झाल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले होते. इस्रायलने गाझा पट्टीत केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत १२ हजार ३०० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पाच हजार लहान मुलांचा समावेश आहे.

Exit mobile version