नीरज चोप्राचे नाव आता दिले जाणार ‘या’ संस्थेला

नीरज चोप्राचे नाव आता दिले जाणार ‘या’ संस्थेला

टोकियो, जपान येथे झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून समस्त भारतीयांसाठी गौरवास्पद कामगिरी करणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्यावर असंख्य पुरस्कारांची आतषबाजी झाली. आता त्याचे नाव एका संस्थेला देऊन त्याच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला आहे.

पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटला आता सुभेदार नीरज चोप्रा याचे नाव देण्यात येणार आहे. २३ ऑगस्टला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आर्मी इन्स्टिट्यूटचे नामकरण करण्यात येणार आहे.

२३ वर्षीय नीरज २०१६ला सेनादलात दाखल झाला. त्यावेळी त्याला नायब सुभेदार हे पद देण्यात आले होते. या संस्थेत त्याला सर्वप्रकारचे प्रशिक्षण व सराव प्राप्त झाला. या संस्थेत विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यात तिरंदाजी, मैदानी खेळ, बॉक्सिंग, डायव्हिंग, कुस्ती, तलवारबाजी, वेटलिफ्टिंग अशा क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.

राजनाथ सिंह हे २३ ऑगस्टला एकदिवसाच्या पुणे भेटीवर येत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान संरक्षण संस्था तसेच आर्मी इन्स्टिट्यूट यांच्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानी असतील. भारतीय सेनादलातील १६ ऑलिम्पियनचा सत्कार त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यावेळी या इन्स्टिट्यूटला नीरज चोप्राचे नाव देण्यात येईल. त्या दिवसापासून ही इन्स्टिट्यूट नीरज चोप्रा आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट म्हणून ओळखली जाईल. यापूर्वी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियम, जालंधरमधील बी.एस. बेदी स्टेडियम, के.डी. सिंग बाबू स्टेडियम अशी खेळाडूंच्या नावे असलेली स्टेडियम्स आहेत.

हे ही वाचा:

ज्येष्ठ अभिनेत्री सुनिता शिरोळेंना हवी आहे मदत

एकट्या मोदींविरोधात विरोधकांची एकता

तब्बल २०० जण करणार आहेत अवयवदान

पालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक; पण सर्वोत्तम फक्त तीन

नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मीटर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकले होते. भारताचे ते ऑलिम्पिकमधील दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक ठरले. याआधी, अभिनव बिंद्राने नेमबाजीत बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. भारताला त्यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये हॉकीत आठ सुवर्णपदके मिळालेली आहेत.

Exit mobile version