पाकिस्तानमधील अशांत प्रांत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बलुचिस्तानमधील प्रमुख बलुच मानवाधिकार संघटना, द बलुच याकजेहती समितीने (बीवायसी) सांगितले आहे की, पाकिस्तानच्या काही अधिकाऱ्यांनी बलुच निरपराध विद्यार्थ्यांना अटक केली आहे. बलुच समुदायाविरूद्ध पाकिस्तानच्या सततच्या कारवाया सुरू असून यादरम्यान पाक अधिकाऱ्यांनी निरपराध विद्यार्थ्यांना अटक केली आहे, अशी माहिती समोर आली असून एएनआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
द बलुच याकजेहती समितीने म्हटले आहे की, “गुप्तचर संस्था त्यांच्या सुरक्षेत अपयशी ठरल्यानंतर बदला घेतात. सध्या सक्तीने बेपत्ता होण्याचे प्रमाण विशेषतः पंजाब आणि कराचीमधील बलूच विद्यार्थ्यांसाठी चिंताजनक आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि मदरशांमध्ये शिकणाऱ्या बलुच विद्यार्थ्यांना बळजबरीने गायब करून अंधाऱ्या कोठडीत ठेवले जात आहे.
माहितीनुसार नऊ बलुच विद्यार्थ्यांचे १६ ऑक्टोबर रोजी कराचीतून अपहरण करण्यात आले होते. कायदा, विज्ञान आणि सामाजिक विज्ञान अशा विविध अभ्यासक्रमांमध्ये या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. द बलुच याकजेहती समितीने पाकिस्तान सरकारच्या हातून बलुच नागरिकांवर होत असलेल्या अत्याचारांविरुद्ध जागतिक कारवाईची मागणी केली आहे. “आम्ही जागतिक समुदाय, मानवाधिकार संस्था आणि मीडिया हाऊसना आवाहन करतो की त्यांनी विशेषतः विद्यार्थ्यांच्या सक्तीने बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये होत असलेल्या चिंताजनक वाढीची दखल घ्यावी. त्यांच्या कुटुंबांना सतत वेदना आणि त्यांच्या जीवाची भीती वाटते. बलुच राष्ट्राने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. अशा हिंसाचाराचा सामना करा आणि ही क्रूर प्रथा संपवण्यासाठी प्रतिकार करा,” असे आवाहन करण्यात आले आहे.
हे ही वाचा :
बाबा सिद्दीकींवर झाडलेल्या गोळ्या टर्किशमेड पिस्तूलातील!
राम गोपाल मिश्राच्या हत्येप्रकरणी मोहम्मद दानिशला अटक!
नागरिकत्व सुधारणा कायदा घटनेशी निगडीत, कलम-६ए वैध!
उत्तराखंडमधील मदरशांमध्ये मिळणार संस्कृतचे धडे
यापूर्वी १५ ऑक्टोबर रोजीही असेच बलुच विद्यार्थ्यांना बेपत्ता करण्यात आले होते. द बलुच याकजेहती समितीने सांगितले की, “चार बलूच तरुणांना जबरदस्तीने बेपत्ता करण्यात आले असून हे सर्व परोम, पंजगुरचे रहिवासी आहेत. ते वैद्यकीय कारणासाठी म्हणून कराचीमध्ये होते आणि तेथील एका हॉटेलमध्ये थांबले होते. प्रत्यक्ष साक्षीदारांनी सांगितले की, पोलीस आणि एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी हॉटेलवर छापा टाकला आणि हॉटेल व्यवस्थापकासह मुलांना ताब्यात घेतले. बलुचिस्तानमध्ये बलुचांचा नरसंहार सुरूच आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय समुदाय आणि मानवाधिकार संघटनेला बलुचांविरुद्धच्या अशा अमानवी प्रथांची दखल घेण्याचे आवाहन करतो.”