न्यूझीलंडची अर्थव्यवस्था मंदीत!

सन २०२०नंतर पहिल्यांदाच आली वेळ

न्यूझीलंडची अर्थव्यवस्था मंदीत!

सार्वत्रिक निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिले असतानाच न्यूझीलंडची कृषि व्यवसायावर आधारित अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत गेली आहे. गुरुवारी या संदर्भातील अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली. चक्रीवादळानेही देशाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. न्यूझीलंडने पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा दर ०.१ टक्क्यांनी कमी होण्याचे संकेत दिले आहेत. सन २०२२ च्या अखेरीस अर्थव्यवस्थेचा दर ०.७ टक्क्यांनी घसरला होता. तर, अर्थमंत्री ग्रँट रॉबर्टसन यांनीही मंदी आल्याचे आश्चर्य वाटत नाही, अशी कबुली दिली आहे.

‘आम्हाला कल्पना आहे की, सन २०२३ हे एक आव्हानात्मक वर्ष आहे. जागतिक वाढ मंदावली आहे, चलनवाढ जास्त काळ राहिली आहे आणि नॉर्थ आयलंडमधील चक्रीवादळामुळे घरे आणि व्यवसाय विस्कळीत होत आहेत,’ असे रॉबर्टसन म्हणाले. ऑकलंडमध्ये जानेवारीत आलेला पूर आणि फेब्रुवारीमध्ये धडकलेले गॅब्रिएल चक्रीवादळ या दोन्हींमुळे अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला. हे नुकसान भरून काढण्यासाठी न्यूझीलंडला १५ दशलक्ष न्यूझीलंड डॉलरपर्यंत खर्च येईल, असा सरकारचा अंदाज आहे.

हे ही वाचा:

बिपरजॉय गुजरातला धडकणार! प्रशासन अलर्ट मोड वर

… म्हणून कोलकातामधील विमानतळावर लागली आग

‘बिपरजॉय’चा असाही वादळी विक्रम

सुसज्ज गुजरात करणार बिपरजॉयचा सामना

सन २०२० नंतरची ही न्यूझीलंडची पहिलीच मंदी आहे. सन २०२०मध्ये करोना साथीने थैमान माजवले असताना देशाच्या सीमा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे निर्यात खुंटली होती. अर्थव्यवस्थेचा दर घसरत असताना महागाई ६.७ टक्क्यांवर पोहोचली. १४ ऑक्टोबरची निवडणूक जवळ आली असताना विरोधी पक्षाने सरकारला दोष देण्यास सुरुवात केली आहे. ‘न्यूझीलंडच्या अर्थव्यवस्थेसाठी लाल दिवा दाखवण्याची वेळ आली आहे. महागाई भडकत असताना अर्थव्यवस्था धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे,’ अशी टीका विरोधी पक्षाच्या प्रवक्त्या निकोला विलिस यांनी केली. कृषी, उत्पादन, वाहतूक आणि सेवा या सर्वच क्षेत्रांमध्ये न्यूझीलंडची घसरण झाली आहे.

Exit mobile version